
मालेगाव शहर (जि. नाशिक) : सर्वत्र महागाईचा आगडोंब उसळल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. विशेष म्हणजे दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तूंमुळे घर संसाराची परवड होत आहे. अलिकडे घरगुती गॅस सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर गेल्याने गृहिणींचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या दोन वर्षात गॅस सिलिंडरचे भाव दुप्पटीने वाढले असून, सबसिडीही केंद्र सरकारने बंद केली काय, असा संतप्त सवाल ग्राहक गॅस एजन्सीकडे करीत आहे. देशभरातील सामान्यांना गॅस सिलिंडरसाठी हजार ते एक हजार १०० रुपये मोजावे लागतात. सामान्य जनतेच्या या प्रश्नांवर कुठेही चर्चा होत नसल्याने ‘अळीमिळी गूपचिळी’ अशीच परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. (SAKAL Exclusive Cylinder rates beyond reach of common man What about subsidies Nashik News)
घरगुती गॅसवर ‘सबसिडी’च्या माध्यमातून दरात वेळोवेळी वाढ केली. मात्र, नंतर सबसिडी बंद करण्यात आली असली तर सिलिंडरचे दर कमी झालेले नाहीत. त्यातही सबसिडी (अनुदान) परताव्यात भिन्नता आढळून आल्याचे अनेकांनी सांगितले आहे. सबसिडीच्या नावाखाली केलेली भाववाढ गगनाला भिडली असून, ही आमची आर्थिक पिळवणूक असल्याचा सूर व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी वाढत्या भाववाढीमुळे चूल पेटवत लाकुडफाटा वापरण्यास पसंती दिली आहे.
घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांची १ मे २०२० पासून सबसिडी बंद करण्यात आली. घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान म्हणजेच एलपीजी सबसिडी आता ग्राहकांच्या खात्यात जमा होतच नाही. यापूर्वीही ग्राहकांना अनुदान मिळत होते. पण, अनेक ग्राहकांच्या खात्यात अनुदान जमा होत नसल्याच्या त्या काळातही तक्रारी सातत्याने येत होत्या. आता मात्र गेल्या दोन वर्षांपासून अनुदानच बंद करण्यात आल्याने सबसिडीबाबत विचारणा करणाऱ्या तक्रारी वाढल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गोरगरीबांना सबसिडी पुन्हा मिळावी, अशी मागणी होत आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या ग्राहकांना २०० रुपयांची सबसिडी नियमित दिली जात आहे. वर्षाला बारा सिलिंडरवर सबसिडी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा ९ कोटी लोकांना लाभ होत असला तरी इतर गोरगरीब नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या योजनेपासून वंचित असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची सबसिडी का बंद केली, हा प्रश्न कायम आहे.
सबसिडी कोणाला मिळते?
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना एलपीजीवर सबसिडी दिली जाते. तसेच, वार्षिक उत्पन्न दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्यांना अनुदान दिले जात नाही. दहा लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न पती आणि दोघांचे उत्पन्न जोडून मोजले जाते. भारतातील सर्व राज्यांमध्ये एलपीजी सिलिंडरवर मिळणारे अनुदानही वेगळे आहे.
सिलिंडर दरवाढीचा तक्ता
वर्ष सबसिडीसह किंमत
१ मे २०१८ ६४९ रुपये
१ एप्रिल २०१९ ७०४ रुपये
१ एप्रिल २०२० ७४० रुपये (मूळ किंमत ५८३)
सबसिडी बंद झाल्यानंतरचे दर
१ एप्रिल २०२१ ८१३ रुपये
१ एप्रिल २०२२ ९५३ रुपये
१२ डिसेंबर २०२२ १०५६.५० रुपये
"ग्राहकांना दोन वर्षांपासून सबसिडी बंद आहे. सध्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ग्राहकांना सबसिडी मिळते. गोरगरीब घटक वारंवार सबसिडीबाबत चौकशी करतात."
- प्रमोद वाघ, संचालक, अंबिका गॅस एजन्सी, नांदगाव
"सत्तेसाठी केंद्र सरकारने सबसिडीची सवय लावून गॅसची दरवाढ केली. सामान्य जनतेच्या दृष्टीने जीवनावश्यक वस्तू दर गगनाला भिडलेले असतानाच सिलिंडर भाववाढ सातत्याने केली जाते. सरकारने भाव कमी करावेत अन्यथा सबसिडी पूर्ववत सुरू करावी."
- संदिप शिंदे, प्रवक्ते, जिल्हा किसान युवा क्रांती संघटना
"गोरगरीब जनता गॅस सिलिंडरचा वापर करत होती. वाढत्या महागाईमुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. गोरगरीबांना वाढलेली महागाई परवडत नाही. गॅसच्या किंमती कमी करायला पाहिजे."- अनिता कुवर, गृहिणी, चंदनपुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.