SAKAL Impact : सरकारी पाट्या लावणाऱ्या वाहनचालकांना दणका! शहर पोलिसांकडून धडक कारवाई
SAKAL Impact : खासगी वाहनांना भारत सरकार, महाराष्ट्र शासन, पोलीस अशा सरकारी पाट्या लावून मिरवणाऱ्या वाहन चालकांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी (ता. २९) सकाळच्या सत्रात २८ वाहनचालकांविरोधात पोलिसांनी थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली. (SAKAL Impact drivers installing government plates action by city police)
पुण्यात तथाकथित पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावल्याने राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांवर सरकारी पाट्या लावणे गुन्हा असतानाही नाशिक शहरात भारत सरकार, महाराष्ट्र शासन, पोलीस, न्यायधीश अशा सरकारी पाट्या लावून लक्षणीय संख्येने वाहने आहेत.
यासंदर्भातील वृत्त ‘दै. सकाळ’मधून ‘खासगी वाहनांवर सरकारी पाट्या’ या मथळ्याखालील वृत्त सोमवारी (ता. २९) प्रसिद्ध झाले. या वृत्ताची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये सरकारी पाट्या लावून फिरणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, शहर वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये २८ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. विशेषत: यात बहुतांशी वाहनांवर महाराष्ट्र शासन आणि पोलीस अशा पाट्या लावलेल्या वाहनांचा समावेश आहे. तसेच एक वाहन तर परराज्यातील असून त्यावर भारत सरकार ही पाटी लावण्यात आली होती. त्या वाहनांवरही इ-चलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. (latest marathi news)
"सरकार पाट्या लावणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश शहर वाहतूक पोलीस शाखेला देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. येत्या काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल."
- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा, नाशिक.
शहर वाहतूक शाखेनिहाय कारवाई
- पंचवटी युनिट १ : ३
- सरकारवाडा युनिट २ : ९
- अंबड युनिट ३ : १२
- नाशिकरोड युनिट ४ : ४
- एकूण : २८
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.