
SAKAL Investigative : कुंभ- साधुग्रामसाठी उरली नाही जागा; त्र्यंबकेश्वरमध्ये ‘प्लॉटिंग'चा धंदा तेजीत!
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : येथील श्रीपंच शंभू दशनाम जुना आखाड्यात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी महाराज आले असताना ऑक्टोबर २०२६ ते जुलै २०२८ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
पण खरी कसोटी असणार आहे ती प्रशासन अन् सरकारची. गोदाकाठच्या या जागतिक उत्सवासाठी कुंभ अन् साधुग्रामसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये आता जागाच उरली नाही.
‘प्लॉटिंग’चा तेजीत आलेला व्यवसाय आणि अतिक्रमणासह बांधकामांना फुटलेले पेव, हे त्यामागील प्रमुख कारण बनलंय. (SAKAL Investigative No space left for Kumbh Sadhugram Plotting business booming in Trimbakeshwar nashik news)
त्र्यंबकेश्वरमधील भूखंडाचा गुंठ्याचा भाव २५ ते ४० लाख रुपयांपर्यंत पोचला आहे. ‘प्लॉटिंग'चा धंदा स्थानिकांचा असला, तरीही भूखंड खरेदी करणाऱ्यांमध्ये स्थानिकांप्रमाणे बाहेरच्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०२१ मध्ये विरोधी पक्षनेते असताना त्यांनी साधू-महंतांनी भेट घेऊन साधुग्रामसाठी चर्चा केली होती. मुळातच, कुंभग्रामसाठी जागेचे आरक्षण नाही. इतर आरक्षित क्षेत्रांमध्ये पक्की बांधकामे आणि पक्के रस्ते झाले.
विकास आराखडा योजनेला विरोध झाला होता. मात्र त्यास न जुमानता फायद्यांच्या जागेवर ‘झोन’ ठेवले गेले. कुंभग्राम आणि साधुग्रामसाठी आरक्षण न राहिल्याने कुंभमेळ्यासाठी जागा हा येथे कळीचा मुद्दा बनलाय.
मागील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने साधू-महंत आणि भाविक आले होते. पेगलवाडी ते तळवाडे परिसरात साधू व कुंभग्राम उभारण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर शहरापासून दोन ते पाच किलोमीटर परिघात व्यवस्था करण्यात वाहतुकीच्या सुविधेमुळे अडचण होत नाही, याचाही त्या वेळी अंदाज आला होता.
त्र्यंबकेश्वरमध्ये दहा आखाडे आहेत. त्यांना दशनामी नागा संन्यासी अथवा साधू आखाडे असा उल्लेख केला जातो. त्यांच्या विश्वस्त जागा आणि इमारती आहेत. जुन्या वाड्यांच्या धर्तीवर या इमारती आहेत.
मागील कुंभमेळ्याच्या काळात त्यालगत आखाड्यांनी इमारती उभारल्या. त्यासुद्धा तुटपुंज्या ठरू लागल्या आहेत. साधू-महंत-मंडलेश्वरांप्रमाणे मोठा भक्त परिवार यात सतत होणारी वाढ, हे त्याचे कारण आहे.
‘हायटेक'च्या जमान्यात आखाडे त्यानुरूप झाले असल्याने साधनसामग्रीसह मुबलक जागेची आवश्यकता भासते आहे. मात्र त्याचा विसर प्रशासनाच्या जोडीला स्थानिक लोकप्रतिनिधींनाही पडला आहे.
दुसरीकडे मात्र शेतीच्या जागा पिवळ्या पट्ट्यात समाविष्ट करून घेत गुंठेवारीचा मार्ग विकास आराखडा मंजुरीपूर्वी मोकळा झाला. त्यातून सिंहस्थ कुंभमेळा दुर्लक्षित झाल्याने साधू-महंतांनी नाराजीचा सूर आळवण्यास सुरवात केली.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
मोक्याच्या जागा विकासकांना
शहराची हद्दवाढ होण्यासाठी प्रयत्न करत त्यास मंजुरी मिळविण्यात आली. त्यापूर्वी हद्दवाढीच्या मोक्याच्या जागा विकासकांना मिळाल्या. स्थानिकांची व्यथा आणखी निराळी आहे. शहरातील गल्ल्या छोट्या आहेत, त्यांचे नऊ मीटरमध्ये रुपांतरण करणे आणि जुने वाडे-घरे जमीनदोस्त करावेत, त्यासाठी पर्याय म्हणून आतापासून बाहेर पाडण्यात आलेले ‘प्लॉट’ वाढीव किमतीत व
गैरसोयीचे असल्याच्या धाकाने विकत घेणे आणि ते घ्यावे अन्यथा बेघर होणार अशा मौखिक प्रचाराने शहराबाहेर वसाहती उभ्या राहिल्यात. त्यांची कायदेशीर व्यावहारिकता तपासली जाणार काय? हा कळीचा प्रश्न तयार झाला आहे.
एवढेच नव्हे, तर गुंठेवारीच्या धंद्यातून शेतीप्रमाणे व्यवसायासाठी जागा उपलब्ध होणार की नाही? हा प्रश्न तयार झाला आहे. काही भागात आरक्षण टाकले, तेथे पक्की घरे, सिमेंटचे रस्ते कोणाच्या मेहरबानीने झालीत, याचा खुलासा त्र्यंबकेश्वरवासीयांना हवा आहे.
शिवाय ऐनवेळी कुंभमेळ्याच्या नावाखाली कुठंतरी जागा दाखवायची आणि पटकन निधी मिळवायचा, असा प्रयत्न झाल्यास साधू-महंत आणि आखाड्यांनी हाणून पाडण्याचे ठरवले आहे.
"त्र्यंबकेश्वर हे पवित्र तीर्थक्षेत्र जगमान्य आहे. बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळारुपी धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक येतात. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जागा कायमस्वरूपी असावी. कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण करून त्याच्या माध्यमातून कामे करण्यात यावीत." - महंत शंकरानंद सरस्वती (आनंद आखाडा)
"विकास आराखड्यात कुंभ आणि साधुग्रामसाठी जागा आरक्षित होणे गरजेचे होते. तसे न घडल्याने शहर व परिसरात अतिक्रमण आणि बांधकामांचे पेव फुटेल. रहिवासी जागा होतील आणि त्याची विक्री सुलभतेने होईल, असे प्रयत्न झालेत. मात्र आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी व्यवस्थेसह नियोजन नसल्याने गोंधळाची शक्यता दिसते आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने पिण्याचे पाणी, पोलिस, साधू-संत-महंत निवास व आरोग्य-स्वच्छता अशा विविध व्यवस्थांचे नियोजन आतापासून व्हायला हवे."
- महंत उदयगिरी (अटल आखाडा)