पान-४
सेकंड मेन
--
फोटो क्रमांक : 35309
साक्री : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत ३६ लाख १८ हजार ९३२ रुपयांचे योगदान दिल्याचे कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी कविता मेखे यांच्याकडे सुपूर्द करताना पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी.
--
शिक्षण विभागाची दुष्काळग्रस्तांसाठी ३६ लाखांची मदत
--
साक्री शिक्षण विभागाचा पुढाकार; जिल्ह्यात सर्वाधिक निधी संकलनाचा मान
--
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. १८ : सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपत साक्री पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल ३६ लाख १८ हजार ९३२ रुपये जमा केले. तालुक्यातील एक हजार १५८ शिक्षक व २६ केंद्रप्रमुखांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या भरीव योगदानामुळे जिल्ह्यात सर्वाधिक निधी संकलित करणारा विभाग म्हणून साक्री शिक्षण विभागाचा मान उंचावला आहे.
-
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साक्री तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने आपले एक दिवसाचे वेतन या निधीसाठी दिले असून, त्यामुळे दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत होणार आहे.
-
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव
केवळ ज्ञानदानाचे कार्य न करता समाजावर आलेल्या संकटात मदतीचा हात पुढे करत साक्री शिक्षण विभागाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी गटशिक्षणाधिकारी कविता मेखे, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक तसेच विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. साक्री शिक्षण विभागाने घालून दिलेला हा आदर्श निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरला असून, जिल्ह्यातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.