Nashik : रोज 60 ट्रॅक्टर चाऱ्याची विक्री; बकरी ईदनिमित्त मागणी वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bakari eid

Nashik : रोज 60 ट्रॅक्टर चाऱ्याची विक्री; बकरी ईदनिमित्त मागणी वाढली

मालेगाव (जि. नाशिक) : बकरी ईदनिमित्त (Bakari Eid) शहरात हिरव्या चाऱ्याला (Fodder) मागणी वाढली आहे. गेल्या आठवडाभरापासून विविध चौकांत, रस्त्याच्या कडेला अनेक विक्रेते चारा विक्री करीत आहेत. येथे शहरालगतच्या खेड्यातून हिरवा चारा विक्रीसाठी दाखल झाला आहे. दररोज ६० ट्रॅक्टर चारा विकला जात असून, त्यातून मोठी उलाढाल व अनेकांना तात्पुरता रोजगारही उपलब्ध झाला आहे. (Sale of 60 tractor fodder daily demand increased for bakari eid nashik)

कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे सर्वत्र सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले जात होते. कोरोनाची लाट व निर्बंध शिथिल झाल्याने सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. शहरातील पूर्व भागात बकरी ईदची तयारी जाणवू लागली आहे. अनेक रस्त्यांलगत कुर्बानीच्या जनावरांसाठी हिरवा चारा खरेदी केलेला दिसत आहे. गिरणा धरण परिसर, आघार, चंदनपुरी, डोंगराळे व जवळच्या खेड्यांतून मोठ्या प्रमाणात चारा येत आहे. गेल्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने विहिरींमध्ये मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची लागवड केली. चाऱ्याचा भाव वाढला आहे.

पूर्व भागात बोकड, म्हशी, शेळ्या आदी चौकाचौकांत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. कुर्बानीच्या जनावरे खरेदीनंतर त्याला चारा व अन्य खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत. येथील बडा कब्रस्तान, जमाते-स्वालेहा, टेन्शन चौक, मुशावरत चौक, नूरबाग चौक, सलीमनगर, अब्दुल्लानगर, मदनीनगर, गोल्डननगर, पवारवाडी, सुपर मार्केट, जाफरनगर, आंबेडकर पूल, चारा बाजार या ठिकाणी चारा विक्रीची दुकाने थाटली आहेत. शहरात अजून दहा दिवस चारा मोठ्या प्रमाणात विकला जाणार आहे. चाऱ्यातून शहरात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

चाऱ्यात उसाचा चारा, गव्हाची कुट्टी, सुका चारा, ओला चारा, कडबा, खोंडे यांना मागणी आहे. प्रामुख्याने गव्हाची कुट्टी २५ रुपये किलोप्रमाणे विकली जात असून, त्याला सर्वाधिक मागणी आहे. चाऱ्याची पेंढी चार रुपयांपासून ते वीस रुपयांचा गठ्ठ्याप्रमाणे विकला जात असल्याचे चाराविक्रेते सय्यद सलीम यांनी सांगितले. शहरात व परिसरात महिनाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेताच्या बांधावर असलेले गवत मोठे झाले. ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना गवत व इतर चाराविक्रीतून दररोज दोनशे ते तीनशे रुपये मिळत असल्याचे पाटणे येथील लता माळी यांनी सांगितले.

हेही वाचा: टेक्नोसेव्ही वास्तुविशारद झळकणार मनपाच्या संकेतस्थळावर

चाऱ्याच्या दरात वाढ

गेल्या वर्षी बकरी ईद जेमतेम साजरी झाली. या वेळी ग्रामीण भागातून कोरोनामुळे फारसे चाराविक्रेते येऊ शकले नव्हते. गेल्या वेळी चारा तीन हजार रुपये प्रतिटन होता. यंदा मजुरी, बियाणे, खतांचे दुप्पट भाव वाढल्याने चारा पाच हजार रुपये प्रतिटनप्रमाणे विकला जात आहे. चाऱ्याच्या दरात प्रतिटन दीड ते दोन हजार रुपये वाढ झाली आहे.

हेही वाचा: Nashik : अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडली

Web Title: Sale Of 60 Tractor Fodder Daily Demand Increased For Bakari Eid Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikBakari Eid