राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी समान योजना आखणार - उदय सामंत

uday-samant.jpg
uday-samant.jpg

नाशिक : आपल्या राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट असून, विविध शाखांचे विद्यार्थी सामाजिक कामात सक्रिय सहभाग घेत आहेत, याचा मनस्वी आनंद व अभिमान आहे. पालकांनी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची शासन व शिक्षण खाते काळजी घेत आहे. त्या दृष्टीने लवकरच राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी समान योजना आखली जाणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

उदय सामंत : सकाळ-यिन फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद 
"सकाळ' माध्यम समूहाच्या यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क अर्थात यिन व्यासपीठाच्या फेसबुक पेजवरून विविध क्षेत्रांतील मान्यवर व राज्यभरातील तरुणाईशी त्यांनी मुक्तपणे संवाद साधला. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. माहिती देत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्‍नांचेही निरसन केले. 
श्री. सामंत म्हणाले, की ज्या विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून झाली होती, त्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही परीक्षा रद्द होणार नाहीत. आणीबाणीची परिस्थिती आगामी काळात निर्माण झाल्यास विद्यार्थिहिताच्या काय उपाययोजना आखता येतील, यासाठी कुलगुरूंची समिती नेमली आहे. विद्यार्थी मित्रांनी परीक्षा होतील, असे गृहीत धरून घरात बसून अभ्यास करणे गरजेचे आहे. काही लढाया मैदानात न जाता शांततेच्या मार्गाने लढायच्या असतात, कोरोना हे त्यांपैकीच एक आहे. या विषाणूला आपल्याला घरात बसून हरवायचे आहे. 

प्रवेशित विद्यार्थ्यांनी कसलीही भीती बाळगू नये
फार्मसी तसेच इंजिनिअरिंग शिष्यवृत्ती संदर्भात एका विद्यार्थ्याने प्रश्‍न विचारला असता संबंधित विभागाची शिष्यवृत्ती जमा झाली नसल्यास तत्काळ सचिवांशी बोलून प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल. राज्यातील मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांबाबत आपण राज्यपालांच्या व कुलगुरूंच्या संपर्कात असून, त्यामुळे या ठिकाणी प्रवेशित विद्यार्थ्यांनी कसलीही भीती बाळगू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी घरात बसून या चळवळीत सहभाग घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण करावा, हे सांगत सामंत म्हणाले, की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने व्हेंटिलेटर बनविण्याचे हाती घेतलेले काम माणुसकी व शैक्षणिक क्षेत्राची उंची वाढविणारे आदर्शवत आहे. कोकणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच विद्यार्थी शैक्षणिक शुल्कमाफीसंदर्भात निर्णय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत असून, त्यात उच्च तंत्रशिक्षण खाते सकारात्मक योगदान देईल, अशी ग्वाही सामंत यांनी पालकांना दिली. शैक्षणिक शुल्क प्रलंबित असेल तर यासाठी कोणत्याही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये व घरबसल्या प्राध्यापकांनाही आपले अनमोल योगदान देण्याची गरज आहे. आज कोरोनाविरुद्ध राष्ट्रीय सेवा योजना किंवा इतर माध्यमातून काम करत असलेली तरुणाई आपल्या उद्याच्या सुंदर भविष्याची नांदी असेल, असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com