Nashik News
Nashik Newsesakal

Nashik: मराठी पुस्तकांचा वाचविता धनी ‘विनायक रानडे’

''एखाद्या साधारण कलेची आवड असाधारण व्यासंगापर्यंत कशी उंचावता येते, याचे आजच्या पिढीचे आदर्श उदाहरण म्हणजे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या चळवळीचे कल्पक किमयागार विनायक रानडे. जानेवारीचा दुसरा पंधरवडा सर्वत्र ‘कागदोपत्री मराठी पंधरवडा’ म्हणून साजरा केला जातो, परंतु मराठी मायबोलीचा एका दिवसाचा हा उमाळा दुसऱ्याच दिवशी थंड पडतो. याला अपवाद, विनायकजींच्या ‘मराठमोळ्या ग्रंथपेट्या’.

जेव्हा या पुस्तक पेट्या जगाच्या कानाकोपऱ्यातून क्षणोक्षणी उघडल्या जातात, वाचल्या जातात, तेव्हा मराठी ही पंधरवडयापुरती नटणारी भाषा नसून, तिचे शब्दसौंदर्य अखंड विहरतच असते, असे म्हणावे लागते. नि:स्पृहपणे भाषेवरचे प्रेम सिद्ध करणारा रानडेंसारखा मराठी भाषेचा दूत हे मराठीच्या प्रचार आणि प्रसाराचे भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक यश आहे.'' - तृप्ती चावरे-तिजारे

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

कोणत्याही कलेच्या व्यासंगाचा दर्जा त्या कलेसाठी मिळणाऱ्या पोषक वातावरणावर अवलंबून असतो. वाचन संस्कृती नामशेष होण्याच्या वळणावर, रानडेंनी वाचनाला हे पोषक वातावरण दिले. वाचक जागर व्रत हाती घेतले, तेही कोणत्याही अनुदानाच्या आणि मानधनाच्या अपेक्षेशिवाय आजच्या वाचकाला ग्रंथालयापर्यंत जाण्याइतपतही वेळ नाही ही अडचण ध्यानात घेऊन त्यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या अभिनव कल्पनेने, घरोघरी पुस्तकेच वाचकांच्या भेटीला नेली आणि घरी बसलेल्या समाजात वाचन संस्कृती रुजविली.

या उपक्रमाची विचार-मशागत त्यांनी अशा पद्धतीने केली की, वाचन संस्कृतीची ही वेल आज जागतिक गगनाला गवसणी घालू लागली. आज जगभरातून शेकडो देशात लाखो पुस्तके, हजारो ग्रंथपेट्या, घरोघरी पोचविल्या जातात.

Nashik News
संगीत ही दिवसागणिक फुलणारी कला

तीन कोटीच्या वर रकमेची ग्रंथसंपदा, आणि त्या पुस्तकांचे लाखो वाचक हे या उपक्रमाचे घवघवीत यश आहे. विनायकजींना कविवर्य कुसुमाग्रजांचा प्रदीर्घ सहवास लाभला आहे, तसेच अनेक साहित्यिकांशी संवाद साधता साधता वाचन या कलेविषयी त्यांचा एक वेगळाच दृष्टिकोन विकसित झाला आहे. या दृष्टिकोनातून असे जाणवते, की फक्त पुस्तकी वाचन इतक्या संकुचित स्वरूपात ते वाचनाकडे बघत नाहीत. त्यांच्यासाठी वाचन ही एक जीवन-कला आहे.

या कलेतून ते निसर्ग वाचायला शिकले, कला वाचायला शिकले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माणूस वाचायला शिकले. कला, मग ती कोणतीही असो, तिचे वाचन त्यांना शब्दांशिवायही करता येते. संगीत, गायन, नृत्य, चित्र, शिल्प, रांगोळी, आणि विविधांगी दृश्य आणि श्राव्य कला वाचण्याची एक वेगळी सौंदर्यदृष्टी या कलाकारांमध्ये आहे. नुसतीच कला नाही तर, त्या कलेतील उंची आणि खोलीदेखील रानडेंना वाचता येते.

Nashik News
खरोखरचा बाप माणूस!

साहित्यिकांची आणि कलाकारांची अनुभवसंपन्नता रसिकांच्या ओंजळीपर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या कल्पक उपक्रमातून, त्यांची अविरत धडपड सुरू असते. ग्रंथसंपदेतून त्यांनी स्वत: वेचलेली विचार-संपन्नता ते विविधांगी कलांच्या माध्यमातून प्रकट करीत असतात, हे त्यांच्या कलेतील वेगळेपण आहे.

शब्द वाचण्याचा उपक्रम असो, की कला वाचण्याचे कौशल्य, कोणतेही अर्थसाहाय्य पाठीशी नसताना, साहित्यिक, कलाकार, दानशूर, रसिक आणि सौंदर्य या पाच दुर्मिळ घटकांची रानडे ज्या रीतीने मोट बांधतात, ती पद्धत केवळ थक्क करणारी आहे. शब्दांची आणि कलेची सेवा करता करता, त्यांनाही नकळतच शब्दसिद्धी प्राप्त झाली आहे की काय असे त्यांच्याशी बोलताना जाणवते.

Nashik News
कुतूहलातून विज्ञानाकडे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com