

Saptashrungi Devi Sansthan Trustee Appointment Gets Clear Path After Bombay High Court Quashes Nashik Court Stay Order
esakal
वणी (नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी निवासिनी देवी संस्थानच्या पाच विश्वस्तांच्या निवड प्रक्रियेला स्थगिती देण्यास कारणीभूत ठरलेले पत्र आणि त्यानुषंगाने नाशिक जिल्हा न्यायालयाने काढलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २९) रद्द केला. तत्कालीन मुख्य न्यायमूर्तीच्या निर्देशांनुसार पत्र पाठविल्याचा दावा करण्यात आला असला, तरी त्यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी घेतल्याचे कोणतेही अभिलेखावर नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने विशेष अधिकारी श्रीमती अंजू शेंडे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले. मुख्य न्यायमूर्तीच्या नावाचा वापर करून संबंधित पत्र काढण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ही कृती कायद्याच्या विरोधात आणि गंभीर अनुचित असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने यासंदर्भात दाखल रिट याचिका मंजूर केली. विश्वस्त निवडीची प्रक्रिया रोखण्याबाबतचे पत्र कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नसल्याचे स्पष्ट करत ते रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.