
Ecofriendly Experiment : शेणापासून लाकडासारखे सरपन; पर्यावरणपूरक प्रयोग
वणी (जि. नाशिक) : अंत्यविधी, अग्निहोत्र, होमहवनासह विविध धार्मिक कार्यक्रमात लाकडाची गरज भासते. याचा वापर कमी करून वनसंपदेचा ऱ्हास कमी व्हावा, पर्यावरणाचे रक्षणाबरोबरच गोशाळेतील जनावरांच्या पालनपोषणाचा खर्चास हातभार लागावा यासाठी वणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत शेणापासून विशिष्ट प्रकारचे पर्यावरण पूरक लाकूड तयार केले जात आहे. (Sarpan like wood from cow dung Environmentally Friendly Experiment An initiative of Srikrishna Goshala in Vani Nashik News)
दिंडोरी तालुक्यातील वणी येथील श्रीकृष्ण गो सेवा समितीच्या गोशाळेत अशा ५९६ जनावरांचा सांभाळ सुरू केला आहे. या गोशाळेकडे कत्तलीसाठी नेण्यात येणारी गोवंश जनावरे जप्त केल्यानंतर संगोपनासाठी गोशाळेकडे सोपवण्यात येते.
या जनावरांपासून मिळणारे दूध, शेणखताच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटत असला तरी, गो शाळेत काम करणारे महिला व पुरुष मिळून १४ व्यक्तींचा पगार, गो शाळेचा देखभालीची व अन्य खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच, गोशाळेची अडीच एकर जागा ही भाडे करारावर असल्याने आर्थिक गणित जुळवण्यास गो सेवा समितीस आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता या अडचणींवर मात करण्यासाठी पर्याय शोधण्यात आला आहे.
एक हजार किलो शेण
गो सेवा समितीचा सदरचा होणारा खर्च हलका करण्यासाठी काही देणगीदारांनी कृष्ण गो सेवा समितीस दहा ते बारा लाख रुपयांची देणगी दिली आहे.
देणगींमुळे गो शाळा समितीस दिलासा मिळाला असला तरी, जनावरांच्या चाऱ्या बरोबरच सरकी, ढेप आदींच्या वाढलेल्या किमती यांचा दैनंदिन खर्च तसेच, रोज सुमारे ३० ते ४० ट्रॉली भरतील एवढे सातशे ते एक हजार किलो निघणारे शेण उचलून फेकणे आणि नंतर विक्रीच्या वेळेस परत गाडीत भरणे यासाठी पर्यायी उत्पन्न शोधणे गरजेचे होते.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्यातून गो सेवा समितीला परराज्यात काही गोशाळेत शेणापासून पर्यावरण पूरक असे लाकडाची निर्मिती केली जात असल्याची माहिती मिळाली. ७५ हजाराचे एक मशिन हरियाना येथून खरेदी केले त्याची जुजबी माहिती घेत शेन आणि भुसा मिक्स करून लाकडे बनविली.
वर्षभर पुरेल एवढा साठा गोदामात
मशिनमध्ये साधारण लाकडाची जाड पट्टी काढण्यास ४० ते ५० सेकंद लागतो. दीड ते दोन किलो शेण लागते चार माणसे या साठी मशिन वर लागतात. सुरवातीला प्रतिसाद मिळाला नाही, पण कोविड काळात लाकडांना पर्याय म्हणून अंत्यसंस्कारासाठी अनेकांनी शेणापासून बनविल्या जात असलेल्या लाकडाचा वापर केला, सुरवातीला अकराशे रुपये दर होता मागणी प्रमाणे दर वाढवत तो एक हजार ५०० झाला. आता दोन हजार ५०० रुपये भाव आहे.
टणक पर्यावरण पूरक लाकडाचा खप वाढला, जानेवारी ते मे असे पाच महिने हे शेणापासून लाकूड बनविण्यासाठी चा कालावधी असतो या काळात साधारण वर्षभर पुरेल एवढा साठा गोदामात जमा केला जातो मागणी प्रमाणे तो वजन करून दिला जातो.
"गोशाळेतील जनावरांचे संगोपन करण्याबरोबरच गोशाळा समितीने गोशाळेच्या होणाऱ्या वाढत्या खर्च भागविण्यासाठी पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून जनावरांच्या शेणापासून पर्यावरणपूरक लाकडाची निर्मिती केली आहे. या विक्रीतून गोशाळेला वर्षाकाठी सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे." -विजय बोरा, अध्यक्ष, श्रीकृष्ण गो रक्षक समिती, वणी