
सातपूर (जि. नाशिक) : मंगळवारी (ता. १८) मध्यरात्री घरासमोर उभ्या असलेल्या सुमारे १० ते १२ चारचाकी वाहनांच्या काचा फोडत समाजकंटकांनी दहशत माजविण्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, या आशयाचे निवेदन मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांनी सातपूर पोलिस ठाण्याला दिले आहे. (Satpur again nuisance of thugs Broken glass of 10 vehicles in one night Nashik Crime News)
सातपूर कॉलनी परिसरात रात्री घरासमोर पार्किंग केलेल्या भगवान मोगल यांची (एमएच- १५- बीडी- १६०२) अल्टो गाडी, जीवन जाधव यांची टाटा तियागो (एमएच- १५- जीएल- ३१३९),कृष्णा बोडके यांची शेवरलेट (एचएच- १४- बीएक्स- ४०५१) यासह विविध ठिकाणच्या चारचाकी वाहनांच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या आहे.
मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांनी सातपूर पोलिस ठाणे गाठत आपबिती कथन केली. या वेळी स्वराज्य संघटनेचे पुंडलिक बोडके यांनीही निवेदन सादर केले.
माजी नगरसेवक सलीम शेख यांनी सातपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) सतीश घोटेकर यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी किसन खताळे, रवींद्र सगरे, योगेश लबडे, पुंडलिक बोडके, वैभव महिरे, सोमनाथ पाटील, विजय उल्लारे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
१७ ऑगस्ट २०१६ ला सातपूर कॉलनी शिवनेरी चौक, साईबाबा मंदिर , जिजामाता शाळेजवळ सुमारे अकरा वाहने फोडण्यात आली होती. त्यातील आरोपी अद्याप मोकाट आहे. आज घडलेल्या या घटनेने पाच वर्षांपूर्वीची घटना ताजी झाली.
हारही सुकला नाही तोच...
सातपूर कॉलनी येथील कृष्णा बोडके यांनी मंगळवारी ह्युंदाई कंपनीची नवीन चारचाकी वाहन खरेदी केले आहे. त्या नवीन गाडीला लावलेला फुलांचा हार सुकायच्या आत त्या वाहनाची काच फोडत बोडके कुटुंबीयांच्या आनंदात विरजण टाकण्याचा प्रकार घडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.