esakal | यंदाही बारगळणार CET परीक्षांचे वेळापत्रक; विद्यार्थ्यांना ‘तारीख पे तारीख!
sakal

बोलून बातमी शोधा

exam

यंदाही बारगळणार CET परीक्षांचे वेळापत्रक; विद्यार्थ्यांना ‘तारीख पे तारीख!

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : कोरोना महामारीमुळे (corona pandemic) शैक्षणिक क्षेत्राचा (education sector) पुरताच गोंधळ उडाला असून, राज्‍यस्‍तरीय सीईटी परीक्षांचे (CET exam) नियोजनही अधांतरीच आहे.

यंदाही बारगळणार सीईटी परीक्षांचे वेळापत्रक

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या सीईटी परीक्षांच्या संयोजन प्रक्रियेबाबत जारी निविदांबाबत सीईटी सेलतर्फे ‘तारीख पे तारीख’ दिली जाते आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जप्रक्रियेची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे सद्यःस्‍थिती पाहता सीईटी परीक्षांचे वेळापत्रक यंदाही बारगळण्याची चिन्‍हे आहेत. राज्‍यस्‍तरावर विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांच्‍यातर्फे ही प्रक्रिया राबविली जाते. गेल्या वर्षी २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष संपायला आलेले असतानाही काही अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया सुरूच होत्‍या. यंदाही काहीशी तशीच स्‍थिती असल्‍याने पालक व विद्यार्थ्यांच्‍या पोटात गोळा आला आहे.

हेही वाचा: शिवसेना व्यापारी सेनेच्या जिल्हाध्यक्षांची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

विद्यार्थ्यांच्‍या चिंतेत भर

दरम्यान, २६ मार्चला सीईटी सेलतर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होता. तंत्रशिक्षण, उच्च, कला, कृषी, वैद्यकीय व संलग्‍न हेल्‍थ सायन्‍स शिक्षणक्रमांच्‍या एमएचटी-सीईटी परीक्षा २०२१ संयोजनाबाबत संस्‍थांकडून (एजन्‍सी) निविदा मागविण्यात आल्या होत्या; परंतु ही प्रक्रिया अत्‍यंत संथगतीने सुरू असल्‍याने विद्यार्थ्यांच्‍या चिंतेत भर पडली आहे. पदवी शिक्षणक्रमांच्‍या आधारावर काही शिक्षणक्रमांना प्रवेश दिला जातो. सध्या बहुतांश विद्यापीठांकडून अंतिम वर्षाच्‍या परीक्षा घेतल्‍या जात असताना, पदवीवर आधारित सीईटी परीक्षांची अर्जप्रक्रियादेखील तातडीने सुरू होण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. कोरोना महामारीमुळे सध्या परीक्षा घेणे शक्‍य होणार नाही. असे असले तरी किमान या कालावधीत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असती तर परिस्‍थितीत सुधारणा झाल्‍याबरोबर परीक्षांचे संयोजन करणे सोपे झाले असते, अशी भावना व्‍यक्‍त होते आहे.

हेही वाचा: घरासमोर लावा तुळस, तर परिसरात पिंपळ, वड! कोरोना पार्श्‍वभूमीवर तज्ज्ञांचे मत

१७ मे ठरेल अंतिम?

सर्वप्रथम जारी केलेल्‍या सूचनापत्रकानुसार १२ एप्रिलला निविदा खुल्या केल्या जाणार होत्या. यानंतर पहिल्‍यांदा मुदतवाढ देत १५ एप्रिल ही तारीख निश्‍चित केली गेली. त्यानंतर दुसऱ्यांदा मुदतवाढ देत २७ एप्रिल व तिसऱ्यांदा दिलेल्‍या मुदतवाढीत ४ मेस निविदा उघडणार असल्याचे जाहीर केले होते. आता पुन्‍हा यात बदल करत येत्या १७ मेस निविदा जारी करणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. किमान या वेळी तरी प्रक्रियेला गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त होते आहे.

विद्यार्थ्यांवर दडपण येण्याची भीती

पदवीच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी बहुतांश सीईटी परीक्षा घेतल्‍या जातील. सद्यःस्‍थितीत बारावीच्‍या परीक्षेवर अनिश्‍चिततेचे सावट असताना, जेईई मेन्‍स, नीट यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील परीक्षादेखील आगामी काळात होणार आहेत. अशात एकापाठोपाठ होणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर दडपण येण्याची भीती व्‍यक्‍त होते आहे. ही गोष्ट लक्षात घेत परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित करण्याची अपेक्षा आहे.