अखेर ठरलं...! 2 मे पासून शाळांना सुट्टी; असा असेल सुट्यांचा कालावधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर ठरलं...! 2 मे पासून शाळांना सुट्टी; असा असेल सुट्यांचा कालावधी

अखेर ठरलं...! 2 मे पासून शाळांना सुट्टी; असा असेल सुट्यांचा कालावधी

येवला (जि. नाशिक) : शाळा भरवा आणि सुट्ट्या लांबणीवर...यानिर्णयामुळे गेल्या आठवड्यापासून राज्यभर चर्चेत आलेले शाळांचे सुट्टी प्रकरणाला आता पूर्णविराम मिळणार आहे. शिक्षण विभागाने आज काढलेल्या पत्रानुसार शाळांना सुट्या मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर यापुढे नव्या शैक्षणिक वर्षात महिन्याच्या दुसऱ्या सोमवारपासून शाळा भरणार आहे.

असा असेल सुट्यांचा कालावधी

मुळात दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यात पहिली ते नववी व अकरावीच्या वर्गाच्या परीक्षा घेऊन वाढत्या उन्हामुळे या शाळांना सुट्टी दिली जाते. तर नव्याने दहावी व बारावी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे सकाळच्या सत्रात एक मेपर्यंत जादा तासिका बहुतांशी शाळा घेतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्याने बदल करून एप्रिलच्या पहिल्या तीन आठवड्यात शाळा भरवाव्यात व शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेऊन मग निकाल लावावा असे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र हा मुद्दा चर्चेचा बनल्याने पुन्हा शिक्षण विभागाने ज्या शाळाच्या परीक्षा ठरल्या, अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे, त्या शाळांना यातून सवलत दिली आहे.

हेही वाचा: 'खड्ड्यांचे गाव' म्हणून राज्यात 'या' गावाची नवी ओळख

आज या पूर्ण प्रकारावर पुन्हा एकदा पडदा पडला आहे. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन सुट्यांबाबतची माहिती कळविली आहे तसेच याबाबत शासन स्तरावरून निर्णय जाहीर करावा असे या पत्रात म्हटले आहे. या पत्रानुसार संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीत सुसंगती आणण्यासाठी सोमवार २ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येईल तर रविवार १२ जुनपर्यंत ही सुट्टी ग्राह्य धरण्यात येऊन नव्या शैक्षणिक वर्षात दुसऱ्या सोमवारी १३ जूनला शाळा सुरू होणार आहे. विदर्भामध्ये उन्हामुळे चौथ्या सोमवारी शाळा सुरू होतील. माध्यमिक शाळा संहिता नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचनाही दिल्या आहे.

आता दुसरा सोमवार निश्चित

आता आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी तर विदर्भातील शाळा चौथ्या सोमवारी सुरू होतील असा नवा निर्णयसुद्धा शिक्षण विभागाने घेतला आहे. या सुट्यांसंदर्भात आता शासन स्तरावरून पत्रक निघण्याची प्रतीक्षा शिक्षण विभागाला आहे. दरवर्षीप्रमाणेच सुट्यांचा कालावधी ठेवल्याने या पत्रकाचे शिक्षण विभागाने स्वागत केले असून यावर्षी कोरोनामुळे सुरुवातीला काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असले तरी ते भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे केल्याचा दावा शिक्षण स्तरातून होत आहे.

हेही वाचा: मरण यातना भोगणाऱ्या बाबांना ‘मानवसेवा’ चा आधार

"मुख्याध्यापक संघासह विद्यार्थी आणि पालकांची सुटीविषयी स्पष्ट भूमिका होती. शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे.यामुळे मुख्याध्यापकांना शाळेचे व परिक्षेचे नियोजन करणे सोपे होणार आहे.तसेच मे व जुनच्या सुटयांमुळे विद्यार्थी आनंदी व पालक समाधानी होतील.शाळांच्या बाबतीत शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेताना मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाला विश्वासात घ्यावे.म्हणजे पुन्हा -पुन्हा निर्णय बदलण्याची वेळ येणार नाही." - एस.बी.देशमुख, सचिव, प. महाराष्ट्र राज्य संयुक्त महामंडळ

"दिवाळी पूर्वी काही व त्यानंतर सर्वत्र शाळा सुरळीत सुरू असताना शासनाने सुट्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला होता.आता नेहमीप्रमाणे सुट्ट्यांचा निर्णय झाल्याने शिक्षक, विद्यार्थी,पालकांना दिलासा मिळाला आहे.यावर्षी उन्हाची तीव्रता मोठी असून आत्ताच अनेक विद्यार्थी उन्हामुळे चक्कर येण्यासही इतर आजारांना सामोरे जात आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजेच्या पूर्वीच शाळा भराव्यात." - समीर समदडिया, जिल्हाध्यक्ष, भाजपा विद्यार्थी आघाडी

Web Title: School Holidays From 2nd May Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..