esakal | नाशिक जिल्ह्यात यंत्रणांमध्ये समन्वयाअभावी शाळा सुरू; शिक्षणक्षेत्राची विचित्र कोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

schools

नाशिक जिल्ह्यात यंत्रणांमध्ये समन्वयाअभावी शाळा सुरू

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे जिल्ह्यात शिक्षणाचं चांगभलं चाललंय. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १७) होणारी आपत्ती व्यवस्थापनाची कोरोना आढावा बैठक डावलून शाळा सुरू करण्याची हिंमत दाखवली गेलीय. त्याबद्दलची किती गंभीर दखल जिल्हा प्रशासन घेणार, यावर शिक्षणाचे गाडे सुरळीत होण्याचे भवितव्य अवलंबून असेल. खरं म्हणजे तिसऱ्या लाटेत लहान मुलांची काळजी घेण्याबद्दल तज्ज्ञ सांगताहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही जिल्ह्यातील कोरोनाच्या ‘ॲक्टिव्ह’ रुग्णांबद्दलचा विषय गांभीर्याने घेतला आहे. मग साऱ्या गोष्टींचे वावडे शिक्षणाला का असावे? असा गंभीर प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. (Schools-started-due-to-lack-of-coordination-systems-jpd93)

पालकमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी अन्‌ आपत्ती व्यवस्थापनाला डावलून शाळा सुरू

सिन्नर, सुरगाणा तालुक्यांत शाळा सुरू झाल्या असल्या, तरीही शहर आणि जिल्ह्यातील इतर शाळा सुरू होण्याबाबत नेमकी काय स्थिती आहे, याचा शोध घेतल्यावर ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या उक्तीची प्रचीती आली. हे कमी की काय म्हणून, तालुकास्तरावरून शाळा सुरू का केल्या नाहीत, असा रेटा मुख्याध्यापकांमागे लागल्याने शिक्षण क्षेत्रातील अस्वस्थता टिपेला पोचलीय. त्यावरूनही शिक्षण विभागात आपसांत समन्वय आहे काय? हा प्रश्‍न पुढे आला आहे. शाळा सुरू करण्यासाठी १५ जुलैचा मुहूर्त ठरवण्यात आला होता. पण, राज्यस्तरावरून शाळा सुरू करण्याबद्दलची ठोस भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. यापूर्वी शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला, तरीही जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांच्या स्तरावरून त्याबद्दलचे धोरण निश्‍चित केले जावे, असे सूत्र ठेवण्यात आले होते. आता मात्र शिक्षण विभाग एकीकडे आणि दुसरीकडे कोरोनाविषयक परिस्थिती अशा विचित्र कोंडीत शिक्षणक्षेत्र गुरफटले आहे.

धूसर रेषेचा उठवला फायदा

कोरोनाचे रुग्ण नाहीत. ग्रामशिक्षण समितीचा होकार आहे. पालकांची शाळा सुरू करण्याची इच्छा आहे. ही सारी माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने माहितीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. त्या वेळी पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय होईल, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले. हे सगळे एकीकडे घडत असताना नेमके कोणाच्या भल्याचा विचार शाळा सुरू करण्याच्या धडाक्यातून केला गेला? अशी शंकेची पाल जिल्हावासीयांच्या मनात चुकचुकू लागली आहे. मागील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्यासाठी प्रशासन उत्सुक असताना जिल्हाभरातून टीकेची झोड उठल्यावर शाळा सुरू करण्याची घाई केली नाही. या ताज्या अनुभवाकडे डोळेझाक का केली गेली? याचा शोध घेतला गेला नाही. घाई झालेल्यांवर डोळे वटारले नाही, तर मग शिक्षणाचे काही खरे राहणार नाही, हे सांगण्यासाठी भविष्यकारांची गरज राहणार नाही. एकूण परिस्थिती पाहता शाळा सुरू करण्यासंबंधीचे स्थानिक धोरण स्पष्ट होण्याअगोदरच धूसर रेषेचा फायदा उठवला गेला आहे, असे दिसते.

हेही वाचा: …तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

शाळा-महाविद्यालय सुरू करण्याबद्दल सरकार विचार करत आहे. पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार कोरोनामुक्त करत शाळा सुरू केली. त्यांनी कोरोना प्रतिबंधाची दक्षता घेतली. तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अधिक काळजी घ्यावी लागेल. -राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त

शाळा सुरू करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची परवानगी घ्यावी लागेल. पालकमंत्र्यांच्या मान्यतेची आवश्‍यकता असेल. अशा सूचना आज नाशिक विभागातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. -नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक

जिल्हाधिकारी कार्यालयाला शाळा सुरू करण्यासंबंधीच्या माहितीचा प्रस्ताव देण्यात आला. त्या वेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय होईल, मग शाळा सुरू होतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही शाळा सुरू झाल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. -डॉ. वैशाली झनकर-वीर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

loading image