esakal | नाशिक : गडकरींच्या हस्ते होणार 'त्या' उड्डाणपुलाचे अधिकृत उद्‌घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी

गडकरींच्या हस्ते होणार 'त्या' उड्डाणपुलाचे अधिकृत उद्‌घाटन

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : साधारण दीड महिन्यापूर्वी मुंबई- आग्रा महामार्गावरील क. का. वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेलपर्यंतच्या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godase) यांनी केले असताना आता पुन्हा याच रस्त्याचे दुसऱ्यांदा उद्‌घाटनाचे भाग्य या पुलाला लाभले आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते सोमवारी (ता. ४) सांयकाळी या पुलाचे उद्‌घाटन होणार आहे. हे उद्‌घाटन अधिकृत असल्याचे स्पष्टीकरण भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी शुक्रवारी (ता.१) दिले.


विल्होळी नाका ते क. का. वाघ या दरम्यानच्या उड्डाणपुलामुळे अपघात व वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार होत असल्याने नागरिकांच्या मागणीवरून पूल किंवा बोगदा तयार करण्याची मागणी होत होती. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी पुलासाठी निधी देण्याचे कबूल करताना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सात- आठ महिने पुलाचे काम सुरू होते. दीड महिन्यापूर्वी वाघ महाविद्यालयासमोरील उतार रद्द करून थेट जत्रा हॉटेलपर्यंत उड्डाणपूल तयार झाल्याने अवजड वाहनांमुळे ठप्प होणाऱ्या वाहतुकीचा प्रश्‍न मिटला आहे. परंतु, पुलाच्या कामाचे उद्‌घाटन होत असताना भाजप व शिवसेनेत श्रेयवाद रंगला होता. पूल तयार झाल्यानंतरदेखील श्रेयवादाचा पुढचा अंक सुरूच आहे.

दीड महिन्यांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी पुलाचे उद्‌घाटन करीत वाहतुकीसाठी खुला करण्याचे जाहीर केले होते. याच दरम्यान गडकरी यांनी खासदार गोडसे यांच्यासह आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना पत्र पाठवत पुलासाठी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले होते. गडकरी यांनी राजकारण न करता विकासकामांचे श्रेय भाजप व शिवसेनेला दिले. दरम्यान, सोमवारी (ता. ४) तयार झालेल्या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. यासंदर्भात भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले. या वेळी यापूर्वी पुलाचे उद्‌घाटन झाल्याचे विचारले असता, शहराध्यक्ष पालवे यांनी गडकरी यांच्या हस्ते होणारे उद्‌घाटन अधिकृत असल्याचे स्पष्टीकरण दिले. यापूर्वी पुलाचे झालेले उद्‌घाटन अनधिकृत होते का, याबाबत विचारले असता ते माहीत नाही परंतु, गडकरी यांच्या हस्ते होणारे उद्‌घाटन अधिकृत असल्याची पुस्ती जोडली. पत्रकार परिषदेला आमदार सीमा हिरे, सभागृह नेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार आदी उपस्थित होते.

हेही वाचा: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांचे त्वरित पंचनामे करा - भारती पवार


असे आहेत कार्यक्रमांचे नियोजन
रविवारी (ता. ३) श्री. गडकरी नाशिकमध्ये मुक्कामाला येतील. सांयकाळी सहा वाजता त्यांच्या हस्ते पंचवटी विभागात स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क लोकार्पण सोहळा होईल. सोमवारी (ता. ४) गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे आडगाव नाका ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे ऑनलाइन उद्‌घाटन होईल. या वेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित राहतील. हॉटेल ताज येथे ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

हेही वाचा: 'मुक्‍त'तर्फे विद्यार्थ्यांना घरपोहोच मिळणार मायग्रेशन सर्टिफिकेट

loading image
go to top