Latest Crime News | 'ती'ने डाॅक्टर पतीलाच टाेचले भुलीचे इंजेक्शन; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

'ती'ने डाॅक्टर पतीलाच टाेचले भुलीचे इंजेक्शन; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पंचवटी (जि. नाशिक) : रजिस्टर मॅरेज केलेल्या दुसऱ्या पत्नीचे अनैतिक संबंध डाॅक्टर पतीला समजताच त्याने तिला व तिच्या प्रियकराला विचारणा करून वाद घातला. त्यानंतर पत्नीचा पारा चढल्याने तिने हाॅस्पिटलमध्येच डाॅक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत ठार करण्याचा प्रयत्न केला.

ही याची धक्कादायक घटना म्हसरुळ येथील एका हाॅस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी पीडित डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरच्या दुसऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (second wife injected Bhuli to doctor husband case of attempted murder registered Nashik Latest Crime News)

म्हसरुळ परिसरात ५५ वर्षीय पीडित डॉक्टरचे स्वत:चे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात संशयित पत्नी आणि तिचा प्रियकर १० सप्टेंबरला डॉक्टरला भेटले. तिथे डॉक्टरांसोबत दोघांचे वाद झाले. यानंतर प्रियकर निघून गेला, तर पत्नी डॉक्टरांसमवेत रुग्णालयातील विश्रांती कक्षात गेली.

तिथे डॉक्टरांना तिने भुलीचे इंजेक्शन देत ठार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला सांगितल्यावर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरून डॉक्टरच्या पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या पत्नीचे नात्यातीलच एकाशी अनैतिक संबंध असल्याचे डॉक्टरला कळले. त्यातून हा वाद झाल्याचे कळते.

हेही वाचा: Leopard skin smuggling case : संशयितांचा जामीन नामंजूर; कोठडीत वाढ

अशी ही हिस्ट्री!

तक्रारदार डाॅक्टरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. डॉक्टरांचे सध्याच्या संशयित पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्याच्या पहिल्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या करून घेतली. पहिल्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात ते पाच-सहा वर्षे कारागृहात शिक्षा भाेगत हाेते. डॉक्टरांना दुसऱ्या पत्नीपासूनही एक अपत्य झाले. मात्र, डॉक्टर कारागृहात गेल्याने तिने दुसऱ्याशी लग्न केले.

ज्याच्याशी विवाह झाला त्याचाही काही वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनापूर्वी डॉक्टर कारागृहातून मुक्त झाल्यावर पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलासह राहू लागले. यानंतर सध्याच्या संशयित पत्नीला कोरोना झाल्याने तिने डॉक्टरांच्या रुग्णालयात उपचार घेतले. तेव्हा दोघे पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी रजिस्टर लग्न केल्याचे समाेर येत आहे.

हेही वाचा: Wadala Crime Case : अत्यंत थंड डोक्याने ‘ती’ने केला खून