esakal | ५० वर्षांपासून आदिवासी पाडे तहानलेलेच! बागलाण तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण

बोलून बातमी शोधा

Severe water shortage in tribal areas of Baglan taluka Nashik Marathi News
५० वर्षांपासून आदिवासी पाडे तहानलेलेच! बागलाण तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण
sakal_logo
By
रोहित कणसे

साल्हेर (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पायरपाडा, भिकार सोंडा या आदिवासी पाड्यांवर ५० वर्षांपासून पाण्यासाठी आदिवासी महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरायला तयार नाही. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करून जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

पश्‍चिम पट्ट्यात साल्हेर ग्रामपंचायतींतर्गत महारदर, लहान महारदर, बंधारपाडा, पायरपाडा, भिकारसोंडा, तुपरेपाडा हे सात पाडे आहेत. ग्रामपंचायतीने शासनाकडून २००६ ते २००९ या कालावधीत आदिवासी पाड्यांचा प्रश्न निकाली निघावा म्हणून शासनाने सुमारे दोन कोटींची पाणीपुरवठा योजना तयार केली. ठेकेदार व ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याबाबत नियोजन केले. पायरपाडा व भिकार सोंडा गावांसाठी पायरपाडा येथे विहीर खोदली. पाइपलाइनही दोन्ही गावांसाठी केली. मात्र ठेकेदाराचा निष्काळजीपणा व अर्धवट कामामुळे ही गावे पाण्यापासून वंचित राहिली. भिकार सोंडा येथे पाण्याचा कुठलाही स्रोत नाही. यामुळे सतत पाणीटंचाई असते. पावसाचे पाणी पडल्यास डोंगरावरून वाहते. पाणी पिण्यासाठी ग्रामस्थ वापरतात. येथील गावासाठी विहिरीमध्ये पाणी नाही. पायरपाडा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी एका गावाच्या विहिरीत टाकले जाते व दोराच्या सहाय्याने पाणी शेंदण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते.

या परिसरात ५० वर्षांपासून ही परिस्थिती आहे, असे वयोवृद्ध सांगतात. जनावरांनाही पाणीटंचाई भासते. पायरपाडा येथे कोणतीही योजना नाही. गावामध्ये कूपनलिकेमुळे पाणीप्रश्न तात्पुरता मिटला असला तरी यात बिघाड झाल्यास ग्रामपंचायत त्याकडे पाहत नाही. ग्रामस्थ घरी असले तरच दुरुस्ती करण्यात येते. कूपनलिकेचे पाणी दोन प्लॅस्टिकच्या टाक्यांत टाकून जेमतेम पाणी नंबर लावून महिला उन्हात पाणी भरतात. जनावरांनाही पाणी नाही. पाण्याची दुर्गंधी असल्यास जनावरेही पाणी पिण्यास धजावत नाहीत. ग्रामपंचायत पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. मात्र या गावांमध्ये पाणीटंचाई कायम असते. लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.

साल्हेर ग्रामपंचायतींतर्गत सात आदिवासी पाड्यांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात पाणी वाहून केळझर धरणात जाते. धरण शेजारी असूनही गावे पाण्यापासून वंचित आहेत. लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पाणीप्रश्न सोडवावा.
-राणी भोये, सरपंच

भिकार सोंडा, पायरपाडा या दोन्ही गावांसाठी टॅँकरचा प्रस्ताव पंचायत समितीला दिला आहे. मंजूर झाल्यास पाणीपुरवठा करण्यात येईल.
-गणेश जाधव, ग्रामसेवक, साल्हेर