फोटो : H31854
लोगो : नवरात्र चिंतन - १
---
आदिशक्ती शैलपुत्रीचे स्वरूप आणि महिमा
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. आपल्या प्रत्येकातील शक्तीचे स्वरूप उत्तम रीतीने विकसित व्हावे, आपल्याकडून ऊर्जेचे, चैतन्याचे आणि सकारात्मक कार्याचे प्रकटीकरण व्हावे, यासाठी शक्तीउपासनेचा विचार भारतीय संस्कृतीने केला आहे. बारकाईने विचार केला, तर सृष्टीच्या प्रारंभापासून शक्तीउपासनेचे अस्तित्व दिसून येते. सत्ययुगात पराविद्या, द्वापारयुगात ब्रह्मविद्या, त्रेतायुगात श्रीविद्या आणि कलियुगात आदिशक्ती अशा विविध नावांनी या शक्तीचा उल्लेख केला जातो. याच आदिशक्तीची नऊ रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात. आज आपण पहिल्या दुर्गेचे, म्हणजेच शैलपुत्री देवीचे स्वरूप जाणून घेऊया.
- लक्ष्मीकांत म. जोशी, नाशिक
पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळे देवीला शैलपुत्री हे नाव प्राप्त झाले. ती वृषभावर आरूढ असून तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. पूर्वजन्मात प्रजापती दक्षाची कन्या म्हणून तिचा जन्म झाला होता. त्या वेळी ती सती या नावाने ओळखली जात होती. तिचा विवाह भगवान शंकरांशी झाला. दक्षाला भगवान शंकरांचे स्वरूप आवडत नव्हते. त्यामुळे तो नेहमी त्यांची निंदा करीत असे. एकदा त्याने मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आणि सर्व देवदेवता व ऋषीमुनींना आमंत्रित केले; मात्र भगवान शंकरांना आमंत्रण दिले नाही. भगवान शंकरांनी सतीला तेथे न जाण्याचा सल्ला दिला. तथापि, माहेरच्या ओढीमुळे सती दक्षाच्या यज्ञाला गेली. तेथे तिला भगवान शंकरांविषयी अपमानास्पद बोलणे ऐकावे लागले. तसेच यज्ञात त्यांना हविर्भाग न दिल्याचेही तिने पाहिले. या अपमानामुळे संतप्त झालेल्या सतीने योगाग्नीने देहत्याग केला. यामुळे भगवान शंकर आणि त्यांचे गण संतप्त झाले. त्यांनी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. पुढील जन्मात सतीने हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. तीच शैलपुत्री होय. उपनिषदांतील एका कथेनुसार, देवीने हैमवती स्वरूपात देवतांचा गर्वही हरण केला. पार्वती आणि हैमवती ही देवीची अन्य नावे आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे पूजन केले जाते. देवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करून त्यांना यशाचा मार्ग दाखवते, अशी श्रद्धा आहे. योगसाधनेच्या प्रारंभी योगी मूलाधारचक्रावर मन स्थिर करून साधना करतात.
अशा या शैलपुत्री देवीला वंदन करताना म्हणूया,
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥