(पान १ ला मेन)
फोटो : NSK26H31893/ NSK26H31898
नंदुरबार : शनिमांडळ येथील शनि मंदिरातील मनमोहक मुर्ती दुसऱ्या छायाचित्रात दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी.
-----------------
शनी देवाच्या चरणी भाविकांची मांदियाळी
शनिमांडळ : शनी अमावस्येनिमित्त दर्शनासाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १० : संपूर्ण खानदेशात प्रसिध्द असलेल्या नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील शनिमंदिरात शनि देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शनिमांडळ येथे शनि साडेसाती मुक्तीचे शनि महाराज देवस्थान असून, या ठिकाणी शनी अमावस्येला यात्रा भरत असते. ज्यांना साडेसाती आहे, असे भाविक शनी अमावस्येला हजेरी लावून शनी महाराजांना तेल, नारळ अर्पण करीत असतात.
राजा विक्रम व शनि महाराज यांची यांची कथा याठिकाणी घडली आहे. यामुळे येथील देवस्थानाला विशेष महत्त्व आहे. यावर्षी सर्वपित्री अमावस्या आणि शनी अमावस्या एकत्रित आली. ५३ वर्षांनी हा योग आल्याने भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली होती. शनेश्वर ट्रस्टतर्फे भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. पिठलं भाकरी व भात असा महाप्रसाद वाटप करण्यात आला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याठिकाणी शनी मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून, भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे.
शनी अमावस्येनिमित्त मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते. विविध वस्तूंच्या दुकानांसह पूजेचे साहित्य नारळ, तेल, हार खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली. मोठ्या प्रमाणावर तेल आणि नारळाची विक्री झाली. मंदिर परिसरात अभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या मंदिराला ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. पुढील काळात शनेश्वर ट्रस्टतर्फे शनि भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव मोरे, संचालक हिम्मत पाटील तसेच संचालक मंडळाने दिली.