Asha Bhosale: स्वर नभांगणातील लखलखता तारा...स्वरसम्राज्ञी आशा भोसले

asha bhosale
asha bhosaleesakal

स्वरसम्राज्ञी, स्वरमोहिनी,

स्वररागिणी की स्वरसंमोहिनी?

कोणत्या नावे तुज उदगारावे?

स्वर आशेचे कोणत्या नभातून बरसावे?

"महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतीयांच्या हृदयातील सूरनक्षत्र, गझल, भक्ति-भावगीत, कॅब्रे-सिनेगीत, नाट्यगीत, बालगीत, लावणी वा बंदिश! गीताचे सारे ‘भाव’ केले यांनी. पवित्र वर्णावी थोरवी यांची. मंगेशकरी पंचस्वरातील अखंड झळझळणारे हे सूरनक्षत्र!"

- विजयालक्ष्मी मणेरीकर (लक्ष्मीमंगेश), नाशिक

(shining star of Swar Nabhangan Vocal empress Asha Bhosale nashik)

आपल्या मधाळ आवाजानं गेली आठ दशकं रसिकहृदयावर राज्य करणाऱ्या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणजे आशा भोसले!

हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत खट्याळ, मादक, उडत्या चालीबरोबरच दर्दभऱ्या गीतांनी आपली प्रतिमा सिद्ध करणाऱ्या आशाताईंबद्दल काही लिहिणे म्हणजे काजव्याने सूर्य किती देदीप्यमान आहे, हे सांगण्यासारखे आहे.

त्यांचा जन्म १९३३ मध्ये संगीतसूर्य मास्टर दीनानाथ व शुद्धमती मंगेशकर यांच्या पोटी झाला. लता, मीना, आशा, उषा, हृदयनाथ या पंचरत्नातील एक रत्न म्हणजे आशा भोसले. या पाचही भावंडांनी अल्पवयातच गायन कारकीर्द सुरू केली.

अवघ्या दहाव्या वर्षी ‘चुनरिया’ या चित्रपटासाठी हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायन करून आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. परिश्रमाची तयारी, जिद्द आणि प्रतिभा यांच्या बळावर त्यांनी हिंदुस्तानी अभिजात संगीतात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले.

ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन आणि सुधीर फडके या संगीतकारांबरोबर त्यांची कारकीर्द गाजली व स्थिरावली. त्यांचा लहान भाऊ म्हणजे पं. हृदयनाथ मंगेशकर यांची गीते आशाताईंच्या जीवनातील अजरामर गीते ठरली.

‘एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी’ गाणाऱ्या आशाताईंनी जगातील कोणते संगीत गायले नाही व जीवनातले कोणते दु:ख साहले नाही? दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकच, सगळी दुःखे पचवून त्या सगळे काही गायल्या आणि संगीत जगतातला सर्वोच्च ग्रॅमी ॲवॉर्ड मिळवून भारतातल्या नव्हे, तर जगातल्या लोकप्रिय गायिका ठरल्या.

‘भोगले जे दु:ख ज्याला सुख म्हणावे लागले,

एवढे मी भोगले की मज हसावे लागले’

सुरेश भटांनी लिहिलेल्या या दोन ओळी आशाताईंची संपूर्ण जीवन कहाणी सांगतात. कोणी म्हणते २० हजार, कोणी म्हणते ३० हजार... जन्माला आल्यापासून आतापर्यंत जेवढे दिवस झाले, तेवढी गीते त्या गायल्या!

त्यांच्या बालपणापासून आतापर्यंत त्यांच्याबद्दल जेही घडले ते सारे कथा- कादंबरीतल्या कल्पनारम्य चमत्कारासारखे भासते. सारी कटुसत्ये पचवून स्वरतेजाची झळाळी घेऊन त्या अखंड तळपत राहिल्या.

asha bhosale
क्रांतिवीर चपाती!

रवींद्र संगीत, नझरुल गीते, लोकगीते, पॉप असे सारे गावून पुनः-पुन्हा मराठीवरच प्रेम करीत मराठीच बनून राहिल्या.

आवाजातून अभिनय करता येतो, हे त्यांनी चित्रपटसृष्टीला शिकविले. उत्कटता, मार्दवता, आर्जवता, रौद्रता, सात्त्विकता, अट्टाहास अशा सगळ्या भावना साभिनय गाण्यातून व्यक्त करणाऱ्या एकमेव द्वितीया म्हणजे आशाताई!

रेडिओच्या जमान्यापासून मोबाईलच्या जमान्यापर्यंत साऱ्या माध्यमांतून स्वतःला सातत्याने अपडेट ठेवून रसिकप्रिय ठरणाऱ्या आशाताई गेली आठ दशकं संगीत सेवा करीत आहेत.

नाच रे मोरा, चंदाराणी, एक झोका अशा बालगीतांतून बालभाव व्यक्त करणाऱ्या आशाताई जेव्हा जिवलगाचा आर्त सूर लावतात, तेव्हा विरहिणी होतात. ‘उषःकाल होता-होता’ गातात, तेव्हा क्रांतिकारी भासतात.

‘दिन तैशी रजनी’ गातात, तेव्हा संतत्व ल्यालेली ज्ञानदेव माउलीच भासतात आणि ‘रुपेरी वाळूत’ गातात, तेव्हा मादक प्रेयसीचा स्वराविष्कार होतात.

‘तरुण आहे रात्र अजूनी’ ही गझल फक्त आशाताईंसाठीच संगीतबद्ध केलीय असे वाटते, इतके चढ-उतार, ताना, त्यासोबत अतिशय संथ ठहराव अशी सुरावट बाळासाहेबांनी रचलेली आहे.

मास्टर दीनानाथांची प्रेमसेवा शरण, युवती मना दारुण, विलोपले, शूरा मी वंदिले, रवी मी अशी सगळीच नाट्यगीते गावून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या गायकीची ही ‘मर्मबंधातली ठेव’ जगाला दाखवून दिली.

त्यांचे पं. भीमसेन जोशींबरोबरचे ‘रस बरसन अमृत वीणा’ हे जोग रागावर आधारित गीत असो वा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याबरोबरचे ‘ही कुणी छेडीली तार’ अथवा गझलनवाज उत्साद गुलाम अलींबरोबर गायिलेल्या ‘मिराज-ए-गझल’मधल्या अनवट ऊर्दू गझला असो अथवा उत्साद अली अकबर खाँ यांनी केलेल्या तानसेन यांच्या पारंपरिक बंदिशींचे सरोद वादनासह केलेले गायन असो, हे सारं काही अचंबित करणार आहे.

सारे महान कलाकार आपापला एकच प्रांत घेऊन आयुष्यभर त्यातच मास्टरी मिळवून उत्कृष्ट कार्य करीत राहतात; परंतु आयुष्यभर संगीताच्या साऱ्याच प्रांतांत उच्चतम कार्य करीत राहिलेल्या या सूरसम्राज्ञीस महानतेची कोणती उपमा द्यावी? त्यांची महानता स्पष्ट करणारा एकही शब्द जगातल्या कोणत्याही भाषेतील डिक्शनरीत नसावा! ‘दैवी’, ‘ईश्वरी’ असे काही असेल तर ते म्हणजे ‘आशाताई’!

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

asha bhosale
एज्यु कॉर्नर : मोबाईल, मुले आणि पालक

लहानपणीची एक हट्टी लढवय्या मुलगी, सहनशील पतिव्रता, अखंड ममत्वाचा झरा असलेली आई, बाणेदार स्वाभिमानी मराठी बाई, खंबीर- हुशार- चतुर, दूरदृष्टिकोन असलेली एक व्यावसायिक आणि अतिशय कोमल हृदय असणारी आपल्या लहान भावावर म्हणजेच बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम करणारी बहीण म्हणजे आशाताई.

सर्वगुणसंपन्न सामान्य लोकांना सातत्याने असामान्यत्वाचा परीसस्पर्श देणारी, नेणीवे पलीकडचे आयुष्य जगणारी, अंतर्बाह्य दैवत्व लाभलेली, सत्शील माणूस म्हणजे आशाताई.

चहुओर पसरलेल्या सागराची कुठली लाट हातात मावेल किंवा नजरेत ठहरेल? हे जसे अशक्य आहे, तसे त्यांच्या गाण्यांची संपूर्ण दखल एका लेखात घेणे अशक्य आहे. इतकं प्रचंड त्यांनी गावून आपल्या संस्कृतीस अलौकिक करून ठेववंय.

सज्जाद, नौशाद, ओ. पी. नय्यर, खय्याम, आर. डी. बर्मन अशा ५०-६० वर्षांपूर्वीच्या संगीतकारांपासून अलीकडील युवा संगीतकारांपर्यंत असंख्य संगीतकारांसाठी त्या अविरत गात आहेत.

सगळ्या संगीतकारांचे भाग्य त्यांनी त्यांच्या विलक्षण अनोख्या गायकीने उजळून टाकले आहे. ‘दिल चीज क्या है’ हे गीत त्यांच्या तोंडून ऐकताना त्या गीताचे महान संगीतकार स्वतः खय्यामजी इतक्या प्रचंड उत्साहाने अचंबित होऊन भारावून त्यांच्याकडे पाहतात, तर सर्व सामान्य रसिकांची काय अवस्था वर्णावी?

हिंदी चित्रपटसृष्टीतील कॅब्रे गीतांना आशाताईंचा स्वर लाभणं आणि हेलनसारख्या नर्तिकेच्या आयुष्याचं सोनं होणं म्हणजे एका सौभाग्य कुलवंतीणीनं पैठणी परिधान करण्याइतकं सुंदर आहे. ‘उमराव जान’ या चित्रपटातील ठुमरी अंगाने गायलेल्या गझलांनी रेखा या सर्वांगसुंदर अभिनेत्रीची प्रतिमा बदलवून टाकणारा हा आवाज ठरला.

नलिनी जयवंत, मधुबाला, नूतन, तनुजा अशा शेकडो अभिनेत्रींना आवाज देत वयाच्या ८७ व्या वर्षी ‘माई’ या चित्रपटात स्वतःच अभिनेत्री बनल्या. त्यांचा जीवनप्रवास हा जगातील सर्व लोकांसाठी, नवपिढीतील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल.

पुरुषप्रधान संस्कृतीचे बहाणे करून हक्क मिळविणारे, दया याचना करणारे अशा सगळ्यांसाठी आशाताईंचे आयुष्य हे मोठे प्रेरणादायक उदाहरण आहे. आशाताईंनी स्वतःच स्वतःचे आयुष्य सार्थ करून स्त्री-पुरुष भेदभावापलीकडे त्या पोहोचल्या आहेत.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं’

अशा घरकुलासाठी, संसारासाठी, मुलाबाळांसाठीच आयुष्यभर गायले, असे आशाताई सगळ्याच मुलाखतींतून सांगतात. आशाताई सांगतात, कित्येक हसरी, रोमँटिक गाणी रडत-रडत गायलीय; पण स्वरांत रडणे दाखविले नाही. जे गीताचे भाव अपेक्षित आहे, तेच दाखविले.

वैयक्तिक खडतर आयुष्य सांभाळत त्यांच्या सामाजिक, व्यावसायिक आयुष्यातल्या उलाढाली या थक्क करणाऱ्या आहेत. त्यांनी आत्मचरित्र लिहावेच, असा आग्रह गझलकार सुरेश भट करायचे, असे मी वाचले आहे.

त्यांचे चरित्र हे त्यांच्या मुलाखतींतून सातत्याने आपल्या पुढे येत राहते आणि आपल्या जीवनात आलेली मरगळ टाकून लगेच पुन्हा काम करण्याची आपली ऊर्जा प्रज्वलित करते.

‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’

हे गाताना आशाताईंना १०० टक्के माहीत आहे, की त्यांचा देव मंगेश सतत त्यांच्यातील दिव्यत्वास प्रखर करतो आहे.

आयुष्याच्या या टप्प्यावर वयाच्या नव्वदीत पदार्पण करणाऱ्या आशाताई म्हणजे उर्जेचा अखंड स्रोत. आजही त्यांच्यातले बालपण, तारुण्य सरलेले नाही. त्या सकारात्मकतेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.

विपरीत परिस्थितीत न खचता स्वतःची ओळख स्वतःच्या जीवावर बनवून इतकी वर्षे सुख-दुःखाचे असंख्य जढ-उतार पाहत आशाताई स्वतःच एक भव्य पर्वत शिखर बनल्या आहेत.

सुधीर मोघेंचे शब्द ‘हे जीवन सुंदर आहे...’ त्या क्षणोक्षणी जगतात. ‘वय’ हा आशाताईंसाठी फक्त एक शब्द आहे. त्यांच्या जीवनप्रवासावर लेख लिहिणे म्हणजे सागरकिनारी पसरलेल्या भव्य वाळूतील एका कणास स्पर्श करणे आहे.

चिरतरुण, चतुरस्र पार्श्वगायिका आशाजींना त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त ही मानवंदना. असेच हसत-खेळत उत्साहवर्धक आपण शतक पार करावे, हीच मनोकामना.

asha bhosale
सह्याद्रीचा माथा : सिंचन प्रकल्पांबाबतची अनास्था दूर व्हावी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com