पळून जाणाऱ्या चोरट्याला शिताफीने पकडले | Sinnar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिन्नर : पळून जाणाऱ्या चोरट्याला शिताफीने पकडले

सिन्नर : पळून जाणाऱ्या चोरट्याला शिताफीने पकडले

सिन्नर : मलढोण (ता.सिन्नर) येथील सरोदे वस्तीवर आज (ता.२४) मध्यरात्री दीडनंतर दहा ते बारा जणांच्या टोळीने दरोडा टाकला. दुचाकीने आलेल्या चोरांनी विटांचा मारा करीत कुटूंबातील लोकांना मारहाण केली. घरात घुसून महिलांच्या अंगावरील दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. मात्र तेवढ्यात घरातील एकाने मोबाईलने लगतच्या वस्तीवर चोर आल्याचे कळविले. इकडे चोरांचा प्रतिकार करीत त्यांना गुंतवून ठेवले. चोरट्यांनी कपाट उचकटत आणखी काही मिळते का हे पाहत असताना लगतच्या वस्तीवरील नागरिक लाठ्याकाठ्यांसह तेथे पोचले. त्यांना येताना पाहताच चोर पळू लागले. काही शेतातून पसार झाले, त्यातील एक जण दुचाकीने पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच कुटूंबातील तरूणाने पाठिमागून त्याच्यावर काठीने वार केला, त्यात चोरटा खाली पडला अन ग्रामस्थांनी त्याला पकडले. कुटूंबातील व्यक्तिंनी दाखविलेले प्रसंगावधान आणि वेळीच धावून आलेले वस्तीवरील लोकांमुळे एका दरोडेखोराला पकडण्यात यश आले. पोलिसा आता इतर चोरट्यांचा माग काढत आहेत.

समृद्धी महामार्गालगत मलढोण-मिरगाव रस्त्यावर वाल्मीक दगडू सरोदे (५०) हे कुटूंबियांसह राहतात. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे श्री.सरोदे हे पडवीत झोपले होते. शेजारीच खाटेवर अंथरूण घालून त्यांची आई रखमाबाई (८०) व पत्नी विमल (४६) झोपल्या होत्या. श्री. सरोदे यांना योगेश, तुळशीराम, नितीन व किशोर ही चार मुले असून दोघांची लग्न झालेली आहेत. हे सर्व जण घरात खोल्यांमध्ये झोपलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा दरोडेखोरांनी वस्तीवर विटांचा मारा सुरू केला. यात कुटूंबप्रमुख वाल्मिक सरोदे उठून आरडाओरड करू लागताच एका चोरट्याने त्यांच्या डोक्यात बिअरची रिकामी बाटली फोडून जखमी केले. इतरांनी बाजेवर झोपलेल्या दोन्ही महिलांना खाली ढकलून दिले.

हेही वाचा: Cricket | टीम पेनला ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक म्हणून संघाचा पाठींबा

चोरट्याचा मोबाईल सापडला

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी पोलिस पथक रवाना केले. पोलिसांनी रात्रभर परिसरातील दहा ते बारा किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. चोरट्यांच्या चपला वस्तीवर विखुरलेल्या आढळून आल्या. घरासमोरील शेतात मिरचीपूड, गजाचे वाकलेले तुकडे आढळून आले. चोरट्यांनी जाताना घरातील दोघांचे मोबाईल फोन सोबत नेले. मात्र एका चोरट्याचा मोबाईल तेथेच पडला.

दिवस उजाडताच निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी सरोदे वस्तीवर येत घटनेची माहिती घेतली. पकडलेल्या चोरट्यास दोडी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. श्री. सरोदे यांना सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची आई व पत्नी यांची ही वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

हेही वाचा: कोट्यवधी खर्चूनही ‘अस्वच्छ परभणी’

मुलांनी केला चोरट्यांचा प्रतिकार

पडवीतून वडिलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरात झोपलेली चारही मुले बाहेर आली असता दबा धरून बसलेल्या चार ते सहा जणांनी त्यांना लोखंडी गज व काठीने मारहाण करायला सुरुवात केली. इतरांनी घरात प्रवेश करत दोन्ही महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. दोन खोल्यांमधील कपाटातून इतर दागिनेही त्यांनी हस्तगत केले. याही परिस्थितीत चारही मुलांनी या चोरट्यांचा प्रतिकार सुरू ठेवला होता. तेवढ्यात एका मुलाने मोबाईलने बाजूच्या वस्त्यांवर व गावात निरोप दिल्यावर स्थानिक शेतकरी व तरुण सरोदे वस्तीकडे मदतीसाठी धावले.

सर्वांबद्दल महत्त्वाची माहिती

पकडलेल्या चोरट्याकडून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या दरोड्यात सहभागी असलेले सर्वजण २० ते २५ वयोगटातील असून ते कोपरगाव व सिन्नर तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांश जण सराईत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. पोलिसांची विविध पथके या तरुणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, सिन्नर व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, श्वानपथक व तसे तज्ञांनी घटनास्थळी येत तपासासाठी माहिती संकलित केली. श्वानाने घरापासून दीड किलोमीटर शेतातून जात समृद्धी महामार्ग गाठला. समृद्धी महामार्गवर रात्री उशिरापर्यंत आम्ही मद्यपान करत होतो व तेथून सरोदे वस्तीवर लक्ष ठेऊन असल्याचे पकडलेल्या चोरट्याने पोलिसांना सांगितले

एका चोरट्याला दुचाकीवरून पाडले

माणसे येत असल्याचे पाहून चोरट्यांची पळापळ सुरू झाली. जाताना पडवीत झोपलेला तो माणूस कुठे आहे असे चोरटे विचारत होते. माणसे जवळ येत असल्याने काही चोरटे शेतातून समृद्धी महामार्गाच्या बाजूला धावले. काही जण रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी घेऊन पळू लागले. याच दरम्यान सरोदे यांच्या एका मुलाने ऋषिकेश राठोड (२५) रा. रुई ता. कोपरगाव) यास पाठीमागून काठीचा घाव घालून दुचाकीसह खाली पाडले. त्याच्या सोबत असलेला एक चोरटा जखमी होऊनही समृद्धी महामार्गाच्या दिशेने पळत गेला. मदतीला धावलेल्या शेतकऱ्यांसह सरोदे बंधूनी राठोड याचा चांगलाच समाचार घेतला. त्याच्या खिशात मिरचीपूड आढळून आली.

loading image
go to top