नाशिक : जुन्या नाशिक परिसरातून १५८ मंडळांनी एकत्र येत शिवजन्मोत्सवा निमित्ताने भव्य शाही पालखी मिरवणूक काढत लक्ष वेधून घेतले. या शाही पालखीमध्ये सहभागी झालेले ढोलपथक, वारकरी, आदिवासी नृत्य यांच्यासह पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला-बालक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
तर, अश्वावर विराजमान झालेल्या शिवाजी महाराज आणि मावळ्यांसह जिजाऊ-बाल शिवाजी यांच्या बग्गीनेही उपस्थितांचे लक्ष वेधले. (Shiv Jayanti 2023 Royal palanquin procession of Shiv Janmotsava grabs attention Old Nashik news)
यंदा जुन्या नाशिकमध्ये प्रथमच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य शाही मिरवणूक काढण्यात आली. या शाही पालखी मिरवणुकीला जुन्या नाशिकमधील शितला देवी मंदिरापासून प्रारंभ झाला.
प्रारंभी, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व हार अर्पण करण्यात आला. यानंतर पालखी मिरवणुकीला तुतारीच्या निनादात प्रारंभ झाला.
नानावली, शिवाजी चौक, आझाद चौक, चव्हाटा, छपरी तालीम, शिरीषकुमार चौक, पाटील गल्ली, गजराज चौक, सुभाष वाचनालय येथून पुन्हा त्याच मार्गाने पालखी मिरवणूक जात शितला देवी मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात समारोप करण्यात आला.
या पालखी मिरवणुकीमध्ये शिवनाद ढोलपथक, शिवतांडव ढोलपथक सहभागी झाले होते. तसेच, त्र्यंबकेश्वर येथील सुमारे १२० वारकरी टाळमृदंगाचा गजर लक्ष वेधत होते. त्याचप्रमाणे, या मिरवणुकीमध्ये वासुदेव, पोतराज, आदिवासी नृत्यपथकही सहभागी झालेले होते.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
तर, पालखी मिरवणुकीमध्ये अश्वावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या समवेत मावळ्याचा जिवंत देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच, बग्गीमध्ये माता जिजाऊ व बाल शिवाजी हेही आकर्षण ठरत होते.
जागोजागी पालखीचे औक्षण करून स्वागत केले जात होते. पालखी मिरवणुकीचा मार्ग भगव्या पताका आणि झेंड्यांनी भगवामय झालेला होता. या मिरवणुकीमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेत जागोजागी शिवरायांचा जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.
डीजे, गुलालाला फाटा
या पालखी मिरवणुकीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, पारंपारिक वाद्य वगळता कोणत्याही वाद्यांचा वापर करण्यात आला नव्हता. डीजे न वापरता त्याऐवजी ढोलपथकांचा समावेश करण्यात आलेला होता. तसेच, कुठेही गुलाल उधळण्यात आला नाही. पुरुष-महिलांनी भगवे फेटे व पारंपारिक वस्त्र परिधान केल्याने वेगळेच वातावरण तयार झाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.