
Nashik : मुल्हेर किल्ल्यावर शिवप्रसाद- रामप्रसाद तोफा विराजमान; सौंदर्यात भर
अंतापूर (जि. नाशिक) : मुल्हेर (ता. बागलाण) येथील ऐतिहासिक किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या तरुणांनी अनेक वर्षापासून दगड- मातीत पडलेल्या ‘शिवप्रसाद’ व ‘रामप्रसाद’ तोफा गाड्यावर विराजमान करून किल्ल्याच्या सौंदर्यात भर पाडून ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला आहे. (Shivprasad Ramprasad canon installed on Mulher fort by sahyadri pratishthan Nashik Latest Marathi News)
सह्याद्री प्रतिष्ठानचे नाशिक जिल्हा प्रशासक साईनाथ सरोदे, विशाल खैरनार, गणेश घोटेकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक व पुणे जिल्ह्यातील १०० च्या वर तरुणांनी ही मोहीम फत्ते केली. प्रतिष्ठानच्या तरुणांनी लोकसभागातून एक लाख ४० हजार रुपयांची रक्कम उभारून नाशिक येथील नामवंत कारागिर सागर पवार यांच्याकडून सागवानी लाकडापासून तोफगाडे करून घेतले.
तोफगाड्यांचे साहित्य सकाळी वाहनाद्वारे नाशिकवरून मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचवले. दुर्गसेवकांनी ‘हर हर महादेव... जय भवानी... जय शिवाजी...’ असा जयघोष करीत साहित्य पायथ्यापासून हातावर वाहून नेत किल्ल्याच्या मध्यावर असलेल्या भगवान सोमेश्वर मंदिरापर्यंत पोहोचते केले. तेथे ते जोडून त्यानंतर तोफगाडे सज्ज झाले.
किल्ल्यावरील सोमेश्वर मंदिराजवळ गडाच्या पूर्वेकडे तोंड करून एक टणाहून अधिक वजनाच्या तोफा पहारी, लोखंडी पाईपचा आधार घेत दोराने खेचून महाप्रयासाने या सागवानी तोफ गाड्यांवरती विराजमान करून भंडारा उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
दगड- मातीत पडलेल्या तोफांना पुनर्जन्म
दुर्गसेवकांनी दोन्ही तोफा खोल दरीतून शोधून काढल्या. पुरातत्त्व खात्याची परवानगी घेत ६ मार्च २०२२ रोजी बारा तासाच्या अति परिश्रमाने त्या किल्ल्यावर विराजमान केल्या होत्या. चारपैकी दोन तोफा कित्येक वर्ष किल्ल्यावरून गायब होत्या. सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांना समजताच शोध घेऊन मोहिमेतून किल्ल्याच्या दोन टोकांच्या दोन दरींमध्ये पडलेल्या ‘शिवप्रसाद’ व ‘रामप्रसाद’ तोफा शोधून काढत त्या किल्ल्यावर आणल्या गेल्या.
"शिवरायांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या महाराष्ट्रात पुरातत्व खाते व राज्य शासनाने गड संवर्धन आणि त्यावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे भावी पिढीसाठी अपेक्षित आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे लोकसभागातून हे काम करत आहे. शासनाने याबाबत ठोस धोरण राबविल्यास गड-किल्ल्यांना निश्चितच पुनर्वैभव प्राप्त होईल."
- साईनाथ सरोदे, प्रशासक, सह्याद्री प्रतिष्ठान, नाशिक