पैसे मोजणाऱ्यांनाच मिळतोय बेड?; नाशिक शहरात कोरोना बेडचा कृत्रिम तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid center.jpg

रुग्णालयांकडून बेडचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून पैसे मोजणाऱ्या रुग्णांनाच भरती केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

पैसे मोजणाऱ्यांनाच मिळतोय बेड?; नाशिक शहरात कोरोना बेडचा कृत्रिम तुटवडा

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने महापालिकेतर्फे बेडची उपलब्धता असल्याचा दावा केला जात आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांना बेड नसल्याचे कारण देत परत पाठविले जात आहे. यातून रुग्णालयांकडून बेडचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून पैसे मोजणाऱ्या रुग्णांनाच भरती केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

शहरात कोरोना बेडचा कृत्रिम तुटवडा 
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. सप्टेंबरपर्यंत उच्चतम पातळीवर पोचलेला कोरोना ऑक्टोबर ते जानेवारीत मोठ्या प्रमाणात उतरणीला लागला होता. मागील वर्षी रुग्णालयांमध्ये रुग्णभरती होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर बिलापासून ते बेड मिळेपर्यंतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने महापालिकेने सेंट्रल बेड रिझर्व्ह सिस्टिम कार्यान्वित केली होती, तर रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेड रिझर्व्ह ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. बेडचे अपडेट्स सिस्टिममध्ये लोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत सर्वच बेड फुल झाले होते. मात्र बिलासंदर्भातील तक्रारी वाढत होत्या.

पैसे मोजणाऱ्या रुग्णांनाच भरती केले जात असल्याचा संशय 

फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याने पूर्वीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन सेंट्रल बेड रिझर्व्ह सिस्टिममध्ये रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात रुग्ण रुग्णालयात पोचल्यानंतर बेड फुल असल्याचे कारण दिले जात असल्याने या माध्यमातून बेडचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 
 
आधी अनामत, नंतर भरती 
रुग्णालयांमध्ये बेड रिक्त असले तरी त्यावर रुग्ण दाखल करताना रुग्णांच्या नातेवाइकांची आर्थिक परिस्थिती तपासूनच भरती केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ठराविक रक्कम भरून घेतली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. 

बाहेरील रुग्ण शहरात 
ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आदी भागातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल होत असल्याने शहरातील नागरिकांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. 

शहरातील बेडची स्थिती 
एकूण रुग्णालये ः ८९ 
एकूण बेड ः ३,७८१ 
सध्या उपलब्ध बेड ः २,११७ 

बेडची वर्गवारी (कंसात उपलब्धता) 
-सर्वसाधारण बेड ः १,४५० (८४८) 
-ऑक्सिजन बेड ः १,४६९ (८३४) 
-आयसीयू बेड ः ५५१ (२५५) 
- व्हेंटिलेटर बेड ः २९४ (१७८)