Nashik : वाढत्या मागणीमुळे राष्ट्रध्वजाचा तुटवडा | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A sign posted in the Khadi village industry shop stating that the national flag is not available.

Nashik : वाढत्या मागणीमुळे राष्ट्रध्वजाचा तुटवडा

जुने नाशिक : ‘हर घर तिरंगा’ उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. तिरंगा झेंड्याची मागणी वाढली आहे. हजारोच्या संख्येने झेंडे विक्री झाल्याने दुकानांमध्ये झेंडे संपल्याचा फलक लागला आहे. टपाल कार्यालयातदेखील झेंड्याचा तुटवडा भासत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि केंद्र सरकारतर्फे यंदा ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. (Shortage of national flag due to increasing demand Azadi Ka Amrit Mahotsav Nashik Latest Marathi News)

नागरिकांमध्येदेखील उपक्रमाबाबत प्रचंड उत्साह आहे. महापालिका विभागीय कार्यालय, खादी ग्रामोद्योग दुकान, टपाल कार्यालय अशा विविध ठिकाणी विक्रीसाठी राष्ट्रध्वज उपलब्ध आहे. खादी ग्रामोद्योगात २५ जुलैपासून मागणी वाढली होती.

दरवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दोन दिवसात हजार ते बाराशे ध्वज खादी ग्रामोद्योगात विक्री होतात. यंदा उपक्रमामुळे २५ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणावर ध्वज विक्री झाली आहे. शासकीय कार्यालय, खासगी कार्यालय, शाळा, महाविद्यालयाकडून मोठ्या ध्वजाची मागणी असते.

असे सुमारे ८०० ध्वज उपक्रमांतर्गत रहिवासी सोसायटी, सामान्य नागरिकांच्या घर, फ्लॅट बंगल्यावर लावण्यासाठी उपलब्ध केले आहे. मध्यम स्वरूपाचे १ हजार ८०० ध्वजाची खादी ग्रामउद्योग दुकानातून विक्री झाल्याची माहिती देण्यात आली.

शिवाय पुढील दिवसात आणखी आठशे ते नऊशे ध्वज विक्री होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. परंतु सोमवारी (ता. ८) संपूर्ण ध्वज विक्री झाल्याने विक्रीसाठी ध्वज शिल्लक नव्हते. नागरिकांची मात्र मागणी होत होती.

काही नागरिक जीपीओ टपाल कार्यालयातदेखील ध्वज खरेदीसाठी गेले असता, शिल्लक नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले. टपाल कार्यालयाच्या नाशिक विभागातून सुमारे ३० हजार, तर जीपीओ टपाल कार्यालयातून विक्री झालेल्या १२ हजार ध्वजाचा समावेश आहे, अशी माहिती वरिष्ठ पोस्ट मास्तर रामसिंग परदेशी यांनी दिली.

"‘हर घर तिरंगा’ उपक्रमामुळे यंदा रहिवासी सोसायटी घरांवर लावण्यासाठी सामान्य नागरिकांकडून तिरंगा ध्वज खरेदी केले जात आहे. त्यामुळे ध्वजाची मागणी वाढली आहे."

- विजय शेलार, व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग