धुळे : टुडे पान २ साठी....अँकर
---
फोटो क्रमांक : 31946
धुळे : श्री एकवीरादेवी मंदिरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई कामाच्या प्रारंभवेळी कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील. शेजारी उपकार्यकारी अभियंता झाल्टे, मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव, ॲड. पंकज गोरे आदी.
---
एकवीरादेवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
धुळ्यात पर्यटन विकासाच्या निधीतून मंदिराच्या वैभवात पडली भर
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ११ : खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी माजी पर्यटनमंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून मंदिराच्या विविध टप्प्यांतील कामे करण्यात येत असून, चौथ्या टप्प्यातील आकर्षक विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. नवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर या रोषणाईचा प्रारंभ करण्यात आला.
विकासकामांच्या चौथ्या टप्प्यात मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रपती भवन, पशुपतीनाथ मंदिर आणि श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या धर्तीवर मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ रंग आणि वर्षभरातील विशेष दिवसांनुसार ही रोषणाई बदलणार आहे. यामुळे मंदिराच्या वैभवात मोठी भर पडली आहे. या विकासकामांमध्ये पहिल्या टप्प्यातील मुख्य प्रवेशद्वार, दुसऱ्या टप्प्यातील नेहरू चौकातील प्रवेशद्वार आणि चौथ्या टप्प्यातील विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील मंदिर गाभारा व सभामंडपाचे काम सुरू आहे.
या कामांची संकल्पना मांडण्यापासून निधी उपलब्ध करण्यापर्यंत शिवसेना (उबाठा) पक्षाच्या युवासेनेचे सहसचिव ॲड. पंकज गोरे यांनी प्रयत्न केले होते. या रोषणाईचा प्रारंभ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील आणि उपकार्यकारी अभियंता झाल्टे यांच्या हस्ते झाला. मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव, ॲड. पंकज गोरे, भटू गुरव, सतीश चौधरी, नीलेश महाजन, नीलेश चौधरी, गोकुळ येलमामे, पवन खांडरे, जयवंत गोरे आदींसह भाविक उपस्थित होते.