Nashik Traffic News : शहरात सिग्नल यंत्रणा ठरतेय कुचकामी; लाल दिवा असूनही दुचाकी अन् चारचाकी सुसाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Signal File Photo

Nashik Traffic News : शहरात सिग्नल यंत्रणा ठरतेय कुचकामी; लाल दिवा असूनही दुचाकी अन् चारचाकी सुसाट!

नाशिक : कधीकाळच्या छोट्या शहराची ओळख आता महानगर म्हणून झाली आहे. वीस लाखांपर्यंत पोचलेल्या शहरातील नागरिकांचे धावते जीवन सुरक्षित राहावे म्हणून यंत्रणेने वर्दळ असलेल्या अनेक चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली खरी.

परंतु वाहतूक शाखेतील तोकड्या मनुष्यबळामुळे अनेक सिग्नलवर ‘लाल दिवा’ असूनही वाहने सुसाट धावत असल्याने ही यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. यात केवळ दुचाकीस्वारच नव्हे तर चारचाकीचालकही आघाडीवर असल्याचे चित्र आहे. (Signal system ineffective in city Despite red light two wheelers and four wheelers moving Nashik Traffic News)

पूर्वेकडील आडगाव, नाशिक रोडपासून पश्‍चिमेकडील सातपूरच्याही पलिकडे तर पांडव लेण्यापासून थेट चामर लेणीपर्यंत शहराचा दक्षिणोत्तर विस्तार झाला आहे. साहजिकच दुचाकीसह चारचाकीच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याने सिग्नल यंत्रणेची निकड भासू लागली.

त्या तुलनेत पोलिसांच्या संख्येत वाढ झालेली नाही, त्यामुळे सिग्नल यंत्रणा उभारूनही अनेक ठिकाणी वाहतूक शाखेचा कर्मचारी उपस्थित नसतो. हे हेरत अनेक वाहनधारक सिग्नल कोणताही असो, आपली वाहने वेगाने दामटत आहेत.

विशेष म्हणजे केवळ दुचाकीचालकच नव्हे तर चारचाकी चालविणारेही नियम मोडण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. यामुळे अनेक चौक वाहतूक प्रवर बनले आहेत.

खडकाळी सिग्नल सर्वाधिक धोकादायक

शालिमार परिसरातून सातपूर, तसेच नाशिक रोडकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे खडकाळी (गंजमाळ) चौक आहे. चोवीस तास मोठी वर्दळ असलेल्या या चौकात गेल्या अनेक वर्षांपासून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

परंतु बहुतांश वेळा या ठिकाणी पोलिस कर्मचारी हजर नसतो. याचा फायदा घेत अनेक वाहनधारक सिग्नल असो वा नको, आपली वाहने भरधाव दामटतात. विशेष म्हणजे या चौकात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचे कामही सुरू आहे. शहरातील हा सर्वात धोकादायक सिग्नल असल्याची प्रतिक्रिया अनेक वाहनधारकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

जुना आडगाव नाका

जुन्या आडगाव नाक्यावरील काट्या मारुती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून, अलीकडेच ती कार्यान्वितही झाली आहे. या ठिकाणी अनेक रस्ते एकत्र येतात. या ठिकाणी वाहतूक शाखेचा कर्मचारी हजर नसला की, अनेक वाहनधारक सिग्नल यंत्रणेला न जुमानता वाहने पुढे दामटतात.

त्यामुळे छोट्या- मोठ्या अपघातासह हमरातुमरीचे प्रसंगही घडत आहेत. त्यातच अनेकजण थेट एकेरी वाहतुकीच्या मार्गावर जात असल्याने कोंडीत भरच पडत आहे. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असूनही सकाळी व सायंकाळच्या सुमारास वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :NashikTraffic