चांदी लुटीचा पोलिसांना लागेना सुगावा; तांत्रिक माहितीचा घेतला जातोय आधार | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

चांदी लुटीचा पोलिसांना लागेना सुगावा; तांत्रिक माहितीचा घेतला जातोय आधार

नाशिक : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळच असलेल्या रस्त्यावर २५ किलो चांदीची लूट करून पसार झालेल्या गुन्हेगारांचा कोणताही सुगावा अद्याप शहर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. संशयित गुन्हेगारांच्या मागावर पाच पोलिस पथके रवाना करण्यात आलेली असून, दुसरीकडे तांत्रिक माहितीच्या आधारावर शहर पोलिसांकडून गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Silver robbery case still unsolved police Nashik Crime latest marathi news)

मेळा बसस्थानकाकडून ठक्कर बाजार बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील किशोर सुधारालयासमोर गेल्या रविवारी (ता.२१) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवरून आलेल्या पाच संशयितांनी चांदीचे पार्सल घेऊन जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्यांना लुटले.

तब्बल २५ किलो चांदी आणि कुरिअर कर्मचाऱ्यांच्याच मोपेड दुचाकीवरून संशयित पसार झाले आहेत. सरकारवाडा पोलिसात अमितसिंग धनसिंग सिकरवार (२४, रा.फावडे लेन, मूळ रा. उत्तरप्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या घटनेला दोन दिवस उलटूनही गुन्हेगारांचा कोणताही सुगावा शहर पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

पोलिसांकडून या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. या फुटेजचा तपास सुरू आहेत. त्याचप्रमाणे परिसरातील मोबाईल लोकेशनच्या तांत्रिक माहितीच्या आधारावर पोलिस तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही, खबऱ्यांकडील माहिती, मोबाइल लोकेशन यावरून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतो आहे.

हेही वाचा: Dhule : होळनांथेच्या तलाठ्याला लाच घेताना पकडले

तसेच, जय बजरंग कुरिअरमधील कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. दरम्यान, घटना घडलेल्या परिसरात पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची निवासस्थाने असून, याठिकाणी सतत पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. असे असताना भररस्त्यावर कुरिअर कर्मचाऱ्यास बंदुकीचा धाक दाखवून व मारहाण करीत २५ किलो चांदी लुटल्याची घटना घडल्याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे.

"चांदी लुटप्रकरणात पोलिसांची पथके गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. तसेच, तांत्रिक तपासाच्या धर्तीवर पोलीस तपास करीत आहेत. लवकरच गुन्ह्यांची उकल होईल."

- साजन सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे.

हेही वाचा: हायड्रोलिक शिडी खरेदीत अनियमितता; मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

Web Title: Silver Robbery Case Still Unsolved Police Nashik Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..