
नामपूर (जि. नाशिक) : महड (ता. बागलाण) येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आजोबा आणि नातवाचा एकाच दिवशी अज्ञात कारणाने मृत्यू (Death) झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच नातीचाही उपचारादरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) मृत्यू झाल्याने गावासह काटवन परिसरात शोककळा पसरली आहे. नेहा अनिल सोनवणे या निष्पाप चिमुरडीवर शुक्रवारी (ता. २९) अंत्यसंस्कार झाले. चार दिवसांच्या अंतराने एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा करुण अंत झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुणे येथील प्रयोगशाळेतून काय अहवाल येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Death of Girl Grandchild in Mahad Nashik News)
महड येथील शेतकरी बाळू शिवबा सोनवणे (वय ६८) यांचे सात जणांचे कुटुंब शेतात राहते. साधारण दहा-बारा दिवसांपूर्वी रात्रीच्या जेवणानंतर कुटुंब झोपले. बाळू सोनवणे, नातू हरी, नात सोनवणे, सूनबाई सरिता सोनवणे यांना सकाळी प्रचंड त्रास जाणवू लागला. डोळ्यांची उघडझाप बंद होणे, गळा दुखणे, गिळायला त्रास होणे, बोलणे बंद होणे अशी लक्षणे खोलीत झोपलेल्या व्यक्तींमध्ये आढळून आली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान नातू हरी (वय १२) व आजोबा बाळू शिवबा सोनवणे यांचा तीन दिवसांपूवी मृत्यू झाला. कुटुंबातील अनिल सोनवणे यांच्या पत्नी सरिता व मुलगी नेहा यांच्यावर नाशिकला उपचार सुरू असताना नेहाचाही मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
शासकीय मदत मिळावी
बागलाणचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल महाजन यांच्या वैद्यकीय पथकाने घटनास्थळी पाहणी केली आहे. संबंधित घटनेचे वैद्यकीय अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेतून सोमवार (ता. २)पर्यंत जिल्हा पातळीवर येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. दरम्यान, आरोग्य क्षेत्राला आव्हान ठरणाऱ्या घटनेमुळे बेताची परिस्थिती असलेल्या सोनवणे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, शासनाने सोनवणे कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे (ZP) माजी सदस्य प्रा. गुलाबराव कापडणीस यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.