Sinnar Accident Case : कोणी एकुलते एक, तर कोणी आई- वडिलांचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 accident news

Sinnar Accident Case : कोणी एकुलते एक, तर कोणी आई- वडिलांचा आधार

सिडको (जि. नाशिक) : मोहदरी घाटात झालेल्या अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.९) घडली. या घटनेत अपघातात मृत विद्यार्थी हे सिडको, राणेनगर व पाथर्डी फाटा परिसरातील रहिवासी होते. हे विद्यार्थी लग्नाला बाहेरगावी जाणार असल्याची पुसटशी कल्पनादेखील त्यांच्या कुटुंबीयांना नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Sinnar Accident News Some alone some support parents Nashik News )

या अपघातातील जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकत असली तरी मात्र काही महिने ते एका शिकवणीमध्ये बरोबर शिकत होते. या व्यतिरिक्त मित्रांसमवेत असलेल्या इतर मित्रांशी ओळख झाल्याने हे सर्व एकमेकांचे मित्र बनले होते. अपघातात पाच विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले असून त्यांच्या घरच्यांसह परिसरातील समस्त रहिवाशांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोणी त्यांच्या आई- वडिलांसाठी एकुलते एक होते, तर कोणी आई वडिलांचा आधार होते.

हर्ष दीपक बोडके (वय १७ रा. कामटवाडे गाव), हा अकरावीला विज्ञान शाखेत भोसला महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शुक्रवारी घरातून चारचाकी वाहनाची चावी घेऊन अर्ध्या तासात महाविद्यालयातून परत येतो, असे सांगून घरातून बाहेर निघाला. परंतु पुन्हा परतलाच नाहीं. घरातून निघताना आपला मोबाईलदेखील घरीच ठेवला होता. त्याच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असून, कामटवाडे गाव येथील स्मशानभूमी येथे त्याचा अंत्यविधी करण्यात आला. साहिलचे वडील दीपक बोडके हे महापालिकेत स्वच्छता मुकादम म्हणून काम करतात.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

हेही वाचा: Crime News : GST कार्यालयाकडून बोगस बिलप्रकरणी एकास अटक

शुभम बारकू तायडे (१७ रा. शिवशक्ती चौक, सिडको) केटीएचएम कॉलेज येथे अकरावीच्या वर्गात विज्ञान शाखेत शिकत होता. शुभमच्या वडीलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले असून, लहान भाऊ, आई असा परिवार आहे. शुभम अभ्यासात हुशार असून मनमिळाऊ स्वभाव असल्याने तो लवकर सर्वांमध्ये समाविष्ट होत. त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर कोणासही लवकर विश्वास पटणे अवघड असल्याने त्याचे समस्त मित्र परिवार त्याच्या घरी येऊन खात्री करत होते. त्याच्यावर मोरवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.

प्रतीक्षा दगू घुले (१७ रा. पाथर्डी फाटा) हिचे वडील व्यावसायिक आहेत. प्रतीक्षा ही केटीएचएम कॉलेज येथे अकरावीत विज्ञान शाखेत शिकत होती. पश्चात आई- वडील एक भाऊ व एक बहीण आहेत. पाथर्डी गाव येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सायली अशोक पाटील (१७ रा. चेतनानगर) सायली ही केटीएचएम महाविद्यालय या ठिकाणी अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. वडील अशोक पाटील सॅमसोनाईट कंपनीत काम करतात. सायली ही आई- वडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. स्वभाव अतिशय मनमिळाऊ असल्याने परिसरात ती सर्वांची लाडकी मुलगी होती. सायलीच्या पश्चात आई, वडील असा परिवार असून मोरवाडी अमरधाम येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयूरी अनिल पाटील (१७ रा. कामटवाडे) मयूरी ही मातोश्री पॉलिटेक्निक कॉलेज येथे डिप्लोमा शिक्षण घेत होती. पश्चात आई, वडील बहीण असा परिवार आहे. त्यांच्या मूळ गावी मालेगाव नजीक असणाऱ्या रामपुरा येथे तिचा अंत्यविधी करण्यात आला. अनिल पाटील खासगी कंपनीत कामास आहेत.

हेही वाचा: ST बसला दे धक्का! दयनीय स्थितीमुळे रस्त्यावरच पडतात बंद