Latest Marathi News | ‘लंपी’ प्रादुर्भावामुळे कत्तलखाने बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lampi Disease

Nashik : ‘लंपी’ प्रादुर्भावामुळे कत्तलखाने बंद

नाशिक : लंपी चर्मरोग आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतात महापालिका हद्दीतील महात्मा फुले मार्केट व भद्रकाली येथील कत्तलखान्यांमध्ये म्हैस वर्गीय जनावरांच्या कत्तलीवर निर्बंध लावले आहे. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने त्यासंदर्भात महापालिकेला आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.(Slaughterhouse banned in nashik district due to Lampi Disease Latest Marathi News)

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिसूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्य लंपी चर्मरोग आजाराकरिता नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सर्व गुरे, म्हशी नियंत्रण क्षेत्रातील आणि त्या बाहेरील अन्य ठिकाणी ने आण करण्यास संपूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे.

त्या अनुषंगाने आणि लंपी चर्मरोग आजाराचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील महात्मा फुले मार्केट आणि भद्रकाली येथील कत्तलखान्यामध्ये म्हैस वर्गीय जनावरांची कत्तल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या नाशिक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयानेदेखील नाशिक महापालिकेला कत्तलखाने बंद ठेवण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिका खबरदारी घेत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

हेही वाचा: Nashik : आधुनिक कुंभमेळा होण्यासाठी स्मार्टसिटी कंपनी सरसावली