नाशिक- पाच महिन्यांच्या काळात जिल्ह्यात ७१५ जणांना सर्पदंश झाला आहे; परंतु वेळीच उपचार मिळाल्याने जिवावरील संकट टाळणे शक्य झाले. मात्र, अजूनही ग्रामीण व आदिवासी भागातील अज्ञानामुळे सर्पदंश झालेल्या रुग्णावर मांत्रिकांकडून वा पानाचा विडा खाऊ घालण्याची प्रथा असल्याने त्यातून सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या जिवावर बेतण्याचीच शक्यता अधिक असते. दरम्यान, याबाबत आरोग्य विभागाकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. त्यामुळे अलीकडे सर्पदंशाचे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जसे वाढले, तसेच सर्पदंशाने मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे.