
पंचाळेत ढगफुटीने फुटला बंधारा
सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील पंचाळे शिवारात सोमवारी (ता. २७) दुपारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने मातीचा साठवण बंधारा फुटल्याची घटना घडली. बंधाऱ्याचे पाणी शेतात शिरल्याने मोठ्या प्रमाणावर मातीही वाहून गेली.
तालुक्याचा पूर्व भाग हा दुष्काळी भाग आहे. मात्र, यंदा परिसरात मॉन्सूनची जोरदार सुरवात झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान पंचाळे परिसरात मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सर्वदूर पाऊस झाल्याने सर्वच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे बघालयला मिळाले.
हेही वाचा: श्रमदानातून शेतकरी कुटुंबाने दुरुस्त केला रस्ता
पंचाळे परिसरात शांताराम थोरात यांच्या शेताजवळ असलेल्या साठवण बंधाऱ्यात कधीच पाणी साठले नव्हते. मात्र, या ढगफुटीसदृश पहिल्याच पावसाने बंधारा तुडुंब भरला. अनेक वर्षांपासून बंधाऱ्यांची डागडुजी व दुरुस्ती न केल्याने हा बंधारा फुटून त्यातील पाणी परिसरातील शेतात गेल्याने मोठे नुकसान झाले.
भोकणी रस्त्यालगत या साठवण बंधाऱ्यात अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कसदार माती वाहून गेली आहे. अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसत होते. शेतातील पातळी कमी होण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने खरिपातील पेरण्यांना उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: नाशिकमध्ये वरुणराजाची जोरदार हजेरी
Web Title: Soil Storage Dam To Burst Due To Cloudburst Rains In Sinnar Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..