सोनांबे: येथील हरसुले गावालगत मंगळवारी (ता. १९) रात्री एक बिबट्या तब्बल साडेचार तास शेतात ठाण मांडून बसला. यादरम्यान त्याने दोन पाळीव कुत्र्यांचा आणि एका कालवडीचा बळी घेतला. ग्रामस्थांनी दिवे टाकून, दगडफेक करून, फटाके फोडून त्याला पळविण्याचे प्रयत्न केले. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. बिबट्याने थेट कालवडीवर झडप घालून तिचा फडशा पाडल्यानंतरच तो पहाटे अडीचच्या सुमारास नजरेआड झाला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.