दामोदर सिनेमा- सारडा सर्कल भागात विशेष अतिक्रमण मोहीम; माजी नगरसेवक येणार अडचणीत : Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Encroachment file photo

Nashik News: दामोदर सिनेमा- सारडा सर्कल भागात विशेष अतिक्रमण मोहीम; माजी नगरसेवक येणार अडचणीत

नाशिक : शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने दूध बाजार ते सारडा सर्कल दरम्यान असलेल्या अतिक्रमणाची माहिती महापालिकेच्या नगररचना विभागाकडून मागितली. यानंतर अर्धवट माहिती देण्यापेक्षा सरसकट पूर्ण रस्त्यावरील अतिक्रमणाचीच माहिती देवून नगररचना विभागाने शिवसेनेच्या नेत्यावरच माहितीचे प्रकरण बूमरँग केल्याने सेनेंतर्गत वाद निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे पीटी शीटवर मार्किंग करून नगररचना विभागाने जवळपास शंभरहून अधिक अतिक्रमणे असल्याचे निदर्शनास आणून देताना या भागात विशेष अतिक्रमण मोहीम राबविण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक माजी नगरसेवक अडचणीत येणार आहे. (Special Encroachment Campaign in Damodar Cinema Sarada Circle Area Former corporator will in trouble Nashik News nashik news)

नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना डिवचण्याचा भाग म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या एका नेत्याने नगररचना व अतिक्रमण विभागाकडे दूध बाजार ते सारडा सर्कल या रस्त्यावरील अतिक्रमणाची माहिती अतिक्रमण विभागाकडे मागितली.

परंतु, पक्के बांधकामे असल्याने अतिक्रमण विभागाने नगररचना विभागाकडे माहितीचा चेंडू टोलवला. नगररचना विभागानेदेखील शिवसेनेच्या त्या नेत्याला ‘मम’ म्हणतं अतिक्रमणांची संख्या मोजण्यासाठी होकार दिला.

मात्र अतिक्रमण मोजायचेच तर दामोदर टॉकीजपासून ते सारडा सर्कलपर्यंत का मोजू नये, असा उलट प्रश्न करत या जवळपास सव्वा किलोमीटर रस्त्यावरील पीटी शीट सादर केले. त्यात जवळपास १०० हून अधिक अतिक्रमणे आढळून आले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

त्यामुळे अतिक्रमण काढायचे तर सरसकट सर्वच भागातील अतिक्रमण काढावे लागेल. त्यासाठी विशेष अतिक्रमण मोहीम राबविण्याचादेखील निर्णय घेतला जाणार आहे .

शिवसेनेवरच अतिक्रमण मोहीम

याच भागात शिवसेनेचे वरिष्ठ नेते व माजी महापौर विनायक पांडे यांचे जुनं घर आहे. मुळात माहिती विचारताना सरसकट संपूर्ण रस्त्यावरीलच माहिती विचारणे अपेक्षित होते.

परंतु माहिती विचारणाऱ्याच्या भूमिकेबद्दल संशय असल्याने नगररचना विभागाने सरसकट संपूर्ण रस्त्यावरील माहिती सादर केल्याने माहितीचे प्रकरण शिवसेनेवरच उलटले आहे. अतिक्रमण मोहीम झाल्यास शिवसेनेला या माहितीची मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikShiv SenaEncroached