Nashik News : श्रीराम, गरुड रथाची डागडुजी सुरू; रास्ते आखाडा तालीम संघाकडून तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Along with Shriram Ratha, Garuda Ratha is undergoing renovation.

Nashik News : श्रीराम, गरुड रथाची डागडुजी सुरू; रास्ते आखाडा तालीम संघाकडून तयारी

नाशिक : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अन् नाशिकचे नाते घट्ट आहे. श्री काळाराम मंदिर देवस्थानतर्फे दरवर्षी श्रीराम जन्मोत्सवानंतर कामदा एकादशीच्या दिवशी सायंकाळी श्रीराम व गरुड रथोत्सवाचे आयोजन केले जाते.

यंदा हा उत्सव १ एप्रिलला साजरा होणार असून त्यानिमित्त श्रीराम व गरुड रथाची डागडुजी सुरू आहे. (Sriram Garuda Ratha repair work started Preparations by team raste akhada talim Nashik News)

यातील श्रीराम रथाची स्वच्छता व डागडुजी रास्ते आखाडा तालीम संघाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. दुसरीकडे काळाराम पूर्व दरवाजा येथील गरुड रथाची डागडुजी व स्वच्छता अंतिम टप्प्यात असल्याचे विश्‍वस्त धनंजय पुजारी यांनी सांगितले. यानंतर दोन्ही रथांना रंग दिला जाणार आहे.

श्रीराम रथाची डागडुजी, ऑइल, ग्रीस, रंगकाम लवकरच सुरू करणार आहे, अशी माहिती श्रीराम रथाचे मानकरी नितीन शेलार यांनी दिली. या वेळी सरदार रास्ते आखाडा तालीम संघाचे राकेश शेळके, नंदू मुठे, दत्तू शेळके, राज जोशी, अरुण शेळके, अनंता शेळके, मयूर शेळके, किशोर जोशी, रोशन कुडके आदी उपस्थित होते.

रामराया आणि नाशिककर यांचे अतूट नाते आहे. राम, लक्ष्मण व सीतेच्या आगमनाने दंडकारण्य आणि त्रिकंटक असणारी ही भूमी खऱ्या अर्थाने ‘जनस्थान’ झाली. नाशिककरांना भेटायला साक्षात श्रीराम वर्षातून एकदा मंदिराबाहेर येतात, रथारूढ होऊन नगर प्रदक्षिणा करतात.

रामनवमीनंतर नाशिककरांना श्रीराम व गरुड रथयात्रेचे वेध लागतात. जन्मोत्सवानंतर कामिका एकादशीला रथयात्रा काढण्याची परंपरा पेशवेकाळापासून चालत आली आहे. काळारामांच्या भोगमूर्ती आणि पादुका मंदिरातून बाहेर आणून पालखीतून मंदिराची प्रदक्षिणा करतात.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यानंतर भोगमूर्ती रामरथात तर पादुका गरुडरथात विराजमान होतात.आरती होऊन वाद्यांचा गजर होतो आणि रामराया नगर प्रदक्षिणेला निघतात. रास्ते आखाड्याकडून रामरथ आणि श्री अहिल्याराम व्यायामशाळेकडून गरुडरथ नाड्यांनी म्हणजे मजबूत दोरखंडाने ओढले जातात.

गरुडरथ नदी ओलांडून जातो

मंदिराच्या पूर्व दरवाजापासून निघालेली रथयात्रा नाग चौक गणेशवाडी येथून जात म्हसोबा पटांगणावर येते. रामराया नदी न ओलांडता इथेच विश्राम करतात. पण गोदेच्या पलीकडे राहणाऱ्या भक्तांना रामकृपाप्रसाद वाटायला गरुडरथ मात्र नदी ओलांडून जातो.

रोकडोबा मंदिरात आरती स्वीकारून नेहरू चौक, दहिपुल, चांदवडकर लेन, मेनरोड, बोहोरापट्टी, सराफ बाजार या मार्गे गरुडरथ भांडी बाजारमार्गे पुन्हा गंगाघाटावर येतो. त्यानंतर हे दोन्ही रथ रात्री उशिरा रामतीर्थाकडे मार्गस्थ होतात. रथाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून आलेल्या भक्तांची गर्दी फुलली असते. रथोत्सवाच्या मार्गावर ठिकठिकाणी सडा- रांगोळ्यांनी रथोत्सवाचे स्वागत केले जाते.