Success Story | जिद्द : नियतीलाही झुकवते आयुष्यातील सकारात्मकता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malatitai Ugale

Success Story | जिद्द : नियतीलाही झुकवते आयुष्यातील सकारात्मकता!

जगण्याची इच्छा प्रत्येक माणसाला प्रबळ बनवत असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यावर सहज मात करू शकतो. यानुसारच तिने घोडदौड सुरू ठेवली.

जीवघेण्या अपघातात २००६ मध्ये दोन्ही हात व पाय गमावूनही नियतीचे आव्हान परतवून लावत देवठाण (देवपूर) येथील मालतीताई उगले महिलांसाठी आयडॉल ठरल्या आहेत. (Success Story of malatitai ugale Positivity in life bends destiny nashik news)

देवठाण येथील सासर व कळवण तालुक्यातील कनाशी येथील माहेरवाशीण असलेल्या मालतीताई यांचे शिक्षण जेमतेम आठवी पास. वडील विश्वनाथ देसाई यांचे कुटुंब तुटपुंज्या शेतीवर गुजराण करत होते.

आई इंदूबाई यांच्यासह कुटुंबातील तीन मुले व तीन मुलींच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असलेलं कुटुंब. शेतमजुरी करत रोजची लढाई लढत होते. त्यात मालतीताई यांच्याही नशिबी कष्ट जणू पाचवीलाच पूजलेले होते. कौटुंबिक अडचणींमुळे मालतीताई यांचे आठवीनंतर शिक्षण सुटले.

कुटुंबातील वाढत्या जबाबदाऱ्या कमी करण्यासाठी वडिलांनी मालतीताई यांचे १९८८ मध्ये लग्न केल्याने शाळा अर्ध्यावरच सुटताना माहेरही लवकर सुटले. त्यांचा विवाह दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथील शिवाजी उगले यांच्याशी झाला. सासरीही परिस्थिती ‘जैसे थे’... उगले परिवाराच्या नशिबी कष्ट होतेच.

पती शिवाजी यांचेही शिक्षण कमी असल्याने ते चालक म्हणून काम करत होते. एकत्र कुटुंबाचा सदस्य होताना देवठाण येथे मालतीताई यांचा शेतीतील कष्टाचा दिनक्रम माहेरसारखाच सुरू राहिला. मात्र त्यांनी याचं कधीही दुःख मानलं नाही.

कुटुंबासाठी बनल्या आधार

पती चालक म्हणून काम करत, तर मालतीताई याही शेतात राबत होत्या. याच काळात गावातील गरज ओळखून त्यांनी गावात छोटेसे किराणा दुकान सुरू केले. एकत्र कुटुंबाचा आधार होत असताना मुलगा सागर, योगेश, मुलगी रोहिणी यांच्यानिमित्ताने कुटुंबाची सदस्यसंख्या वाढली होती. मात्र कुटुंबाला मोठा आधार होत त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरविले.

पाटीलकीने सर्वदूर पोचल्या

१९९६ मध्ये देवठाण (देवपूर) येथील पोलिसपाटील म्हणून निवड झाल्याने कुटुंबाचा आधार असलेल्या मालतीताई यांच्यावर गावाचीही जबाबदारी आली. मात्र परमेश्वराने दिलेल्या या देणगीचं चीज करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. महिला पोलिसपाटील म्हणून दिंडोरी पंचक्रोशीत त्यांनी आपली ओळख उभी केली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

बोनस लाइफ नशिबी

पोलिसपाटील झाल्यानंतर स्वतःची ओळख उभी करण्यासाठी धडपड करत असलेल्या मालतीताई यांच्यापुढे नियतीनं वेगळंच वाढून ठेवलं होतं. अकरा वर्षांपूर्वी नागपूर येथे पोलिसपाटलांच्या अधिवेशनाला परिसरातील अकरा पोलिसपाटील खासगी वाहनाने जात असताना या वाहनाला अपघातात झाला.

या जीवघेण्या अपघातात नऊ सहकारी पोलिसपाटील जागीच ठार झाले, तर दोन जण आश्चर्यकारकरीत्या बचावले. त्यात मालतीताई होत्या. अपघातातून वाचल्या; पण या दुर्दैवी घटनेने मालतीताई यांचे दोन्ही पाय व हात गमवावे लागले. मालतीताई यांच्यासाठी हा पुनर्जन्मच होता. या घटनेनंतर त्या सुमारे दीड वर्षे अंथरुणाला खिळून होत्या.

नियतीवर केली मात

नेहमीच सकारात्मक विचार करणाऱ्या उगले कुटुंबातील आधार असलेल्या मालतीताई यांच्या वाट्याला असाही दिवस येईल, याची पुसटशी कल्पनाही त्यांना करवत नाही. दोन्ही हात व पाय गेल्यानंतरही पुन्हा जगण्याची उमेद घेऊन उभ्या राहिलेल्या मालतीताई या वेगळ्याच ठरल्या. कुटुंबावर ओढवलेल्या या घटनेच्या काळात

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

तीनही मुलं लहान होती. स्वतःला सावरतानाच चिमुकल्यांना आधार देण्यासाठी त्यांची धडपड मोठी होती. मात्र परिस्थिती माणसाला नक्कीच जगण्यासाठी शिकवते, या सकारात्मक भावनेतून त्यांनी याही आजारावर मात केली. मात्र कायमस्वरूपी अपंगत्व नशिबी असतानाही कुटुंबासोबतच डोळस समाजासाठी त्या आधार ठरल्यात. कठीण परिस्थिती आल्यावर त्यातंही जगायचं कसं, याचा जणू सारिपाठच त्यांनी घालवून दिला.

पोलिसपाटील म्हणून कारकीर्द

मालतीताई यांनी अपंगत्वाचा बाऊ न करता कुटुंबाला घडवतानाच समाजाप्रति असलेली सामाजिक बांधिलकीही भक्कम केली. गावासाठी आधार असलेल्या मालतीताई यांनी पोलिसपाटील म्हणून पंचक्रोशीत स्वतःची ओळख उभी करताना पोलिसपाटील संघटनेच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदविलाय.

आयुष्यातील चढ-उतार पाहत आलेल्या प्रसंगात मालतीताई यांनी खचून न जाता त्यावर मात केली. या काळात उगले, देसाई परिवारासोबतच येथील लताबाई गायकवाड, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, चिंतामण मोरे, अशोक सांगळे, सोमनाथ मुळाणे, तनिष्का गटप्रमुख मीना पठाण यांच्यासह पोलिसपाटील संघटनेच्या सदस्यांनी दिलेला आधार मोलाचा असल्याचे त्या सांगतात.

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, तर आपण नक्कीच कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो, हेच दोन्ही हात व दोन्ही पाय गमावलेल्या देवठाण येथील मालतीताई उगले यांनी दाखवून दिलंय.

टॅग्स :Nashik