
Nashik News: कर्मचाऱ्यांचा संप मागे, आता बळीराजाला प्रतीक्षा नुकसानीच्या पंचनाम्याची
नांदगाव : शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आले. गेल्या सात दिवसांपासून येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाच्या आवारात तालुक्यातील जवळपास सर्वच शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना आंदोलनात उतरल्या होत्या. मंगळवारी (ता.२१) पासून पुन्हा एकदा आपापल्या विभागात रुजू झाले.
दरम्यान, तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनाम्याचे खोळंबल्या कामाला गती मिळण्याची शक्यता असून आठवडाभरातील दप्तर दिरंगाई दूर करण्यासोबतच कामकाज सुरु करण्याला प्राधान्य दिले जाईल अशी माहिती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र शेलार यांनी दिली.
पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन मिळाल्याने संपकऱ्यांच्या राज्य समन्वय समितीने कामावर पुन्हा परतण्याचे आवाहन केले असल्यामुळे तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, महसूल, पशू संवर्धन, शिक्षण, ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, कृषी आदी विविध आस्थापनेवरील कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत.
या संपात तालुक्याच्या ८४८ कर्मचाऱ्यांपैकी ७२९ कर्मचारी सहभागी झाले होते. संपकाळात हे आंदोलनकर्ते नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलात उभारण्यात आलेल्या शामियान्यात घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलनाला बसले होते.
हेही वाचा: एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
महसूल, कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, शिक्षक समिती, शिक्षक भारती, शिक्षक सेना, जागृत शिक्षक संघटना, पदवीधर प्राथमिक जुनी पेन्शन कृती समिती, माध्यमिक शिक्षक संघटना, पीडीएफ मुख्याध्यापक संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लेखन कर्मचारी संघटना, अपंग कर्मचारी संघटना आदी संघटना पात उतरल्या होत्या.