
आधी सडकसख्यांना चांगलेच चोपले अन् केले पोलिसांच्या स्वाधीन
नाशिक : सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीच्या घटनांना युवती, महिलांना सामोरे जावे लागते. महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला असताना सडकसख्यांना अद्दल घडविणारी घटना नुकतीच घडली. भोसला सैनिकी महाविद्यालयात (Bhosla Millitary college) शिकणाऱ्या रामदंडी विद्यार्थिनींनी सोमेश्वर परिसरात छेड काढणाऱ्या सडकसखे, टवाळखोरांना आधी चोप दिला, नंतर पोलिसांच्या स्वाधीन करत कर्तव्य बजावले. त्यांच्या धाडसाचे (Courage) सर्वत्र कौतुक होत आहे.
भोसला सैनिकी महाविद्यालयात सैनिकी शिक्षणाबरोबरच स्वयंशिस्त, आत्मसंरक्षणाचे धडे देऊन रामदंडीचे व्यक्तिमत्त्व कणखर, धाडसी (Personality developement) बनवले जाते. वसतिगृहात राहणाऱ्या रामदंडी दहा मुली आऊटपास घेऊन सोमेश्वर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यावर यापैकी काही रामदंडी मुली बर्फाच्या गोळ्याचा आस्वाद घेत होत्या. त्याचवेळी बाजूला पाच टवाळखोर बसलेले होते. या मुलींना पाहून त्यांनी अपशब्द वापरले. मुलींनी सुरवातीला दुर्लक्ष केले. परंतु, त्यांचे अपशब्द सुरूच राहिले. या सडकसख्यांना (Road Romeo) विद्यार्थिनींनी मात्र चोप देत अद्दल घडविली. मुलींनी दाखविलेल्या धाडसाबाबत महाविद्यालयातर्फे प्रा. एस. यू. कुलकर्णी, प्रा. प्रभावती जगताप, प्रा. आर. एस. भोळे, प्रा. पौर्णिमा झेंडे, प्रा. हिरा वाघ, प्रा. अनिता चंद्रात्रे यांच्या हस्ते त्यांना प्राइड रामदंडी हा बॅच देऊन विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी, कॅम्पस को-ऑर्डिनेटर प्रा. डॉ. संजय कंकरेज उपस्थित होते. मेजर विक्रांत कावळे यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा: ...शेवटी ग्रामस्थांनीच पकडून दिला वाळूचा ट्रॅक्टर | Nashik
समजावून न ऐकल्याने दिला चोप
या मुलींनी टवाळखोरांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित सडकसखे हुज्जत घालत त्यांच्यातील एका मुलीच्या पायावर गुटखा थुंकला. या गैरप्रकाराबाबत जाब विचारला असता, टवाळखोरांनी कुरापत काढत मुलींना धक्काबुक्की करायला सुरवात केली. एका मुलींवर हातही उचलला. यानंतर मात्र मुलींनीही अन्याय सहन न करता प्रति उत्तर देण्यासाठी सांघिकतेचे दर्शन दाखवत सडकसख्यांना चांगलाच प्रसाद दिला.
हेही वाचा: हुश…संपले एकदाचे दहावीचे पेपर..!
प्रसंगावधान राखत पोलिसांना संपर्क
सडकसख्यांची धुलाई सुरू असताना त्यातील एकाने खिशातील फोन काढत इतर टवाळखोरांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आणखी टवाळखोर येऊ शकतात, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मुलींनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. त्वरित पोलिस घटनास्थळी दाखल होत पाचही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुलींसमोर उठाबशा काढायला लावत पुन्हा अशाप्रकारे वर्तन करणार नसल्याची कबुली घेत ताब्यात घेतले.
Web Title: Students Bhosla Military College Beat Bullies Then Handedover To Police Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..