Nashik : ‘कॉन्सन्ट्रेटर’ जमा करा अन्यथा निवडणुकीला बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

‘कॉन्सन्ट्रेटर’ जमा करा अन्यथा निवडणुकीला बंदी

नाशिक : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांकडे महापालिकेच्या खर्चातून पडून असलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर परत मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु, एकाही नगरसेवकाकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जमा होत नसल्याने निवडणुकीत उभे राहण्यासाठी प्राप्त करावयाच्या ना हरकत दाखल्यात नोंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कॉन्सन्ट्रेटर जमा करा त्यानंतरच निवडणुकीला उभे राहा, असा अप्रत्यक्ष संदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

कोरोना दुसऱ्या लाटेने मार्च- एप्रिल व मे महिन्यात हाहाकार माजविला. या कालावधीत मागील वर्षाचे सर्व विक्रम मोडीत निघाले. या अडीच महिन्यात एक लाखांहून अधिक रुग्ण आढळून आल्याने ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाली. मार्च महिन्यातच महापालिकेने बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन टाक्या बसविल्यामुळे गैरसोय झाली नाही. परंतु, ऑक्सिजन अभावी अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घेतले गेले नाही. ऑक्सिजन टंचाई काळातच तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध करून देणारा पर्याय म्हणून कॉन्सन्ट्रेटर समोर आले.

आयुक्त जाधव यांनी ऑक्सिजन टंचाई व भविष्यात तिसरी कोरोना लाट येईल, हे गृहीत धरून तत्काळ कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. नगरसेवकांनीदेखील प्रभाग विकास निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी देण्याची तयारी दाखविली. त्यानुसार महापालिकेने तब्बल १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेत कोरियन कंपनीला यंत्रांची ऑर्डर दिली. त्यानुसार महापालिकेकडे कॉन्सन्ट्रेटर प्राप्त झाले. नगरसेवकांकडे यंत्रे सुपूर्द करताना गहाळ होऊ नये म्हणून वर्षनिहाय क्रमांक देण्यात आले. कोणत्या नगरसेवकाला, तसेच कोणत्या अधिकाऱ्याला यंत्रे ताब्यात दिली याची नोंद ठेवण्यात आली.

दुसरी लाट ओसरल्यानंतर नगरसेवकांनी महापालिकेची मालमत्ता म्हणून यंत्रे परत करणे अपेक्षित होते. परंतु, आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला सूचना देवून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुन्हा मागविण्याच्या सूचनादेखील दिल्या. त्यानुसार नगरसेवकांकडे कॉन्सन्ट्रेटर मागविले, परंतु एकाही नगरसेवकाकडून जमा झाले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ना हरकत दाखला न देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: 'गुगल पे' वापरणे होणार आणखी सोपे; नुसते बोलून होतील पैसे ट्रांसफर

ना हरकत दाखला प्राप्त करावा लागणार

पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीला उभे राहणाऱ्या इच्छुकांची महापालिकेकडे कुठल्याही प्रकारची म्हणजे घर व पाणीपट्टी व अन्य कर थकीत नसावे. निवडणूक अर्ज दाखल करताना त्यानुसार ना हरकत दाखला महापालिकेकडून प्राप्त करून घ्यावा लागतो. त्यामुळे आता नगरसेवकांना ना हरकत दाखला घेताना कॉन्सन्ट्रेटर वैद्यकीय विभागाकडे जमा केल्याचादेखील ना हरकत दाखला प्राप्त करून घ्यावा लागणार आहे.

कोरोनाकाळात रुग्ण सेवेसाठी नगरसेवकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर महापालिकेची मालमत्ता असल्याने जमा करणे आवश्‍यक आहे. गरज पडल्यास पुन्हा वापरासाठी देता येतील. त्यामुळे नगरसेवकांनी जमा करावे.

- कैलास जाधव,

आयुक्त, महापालिका

loading image
go to top