
Success Story : पिको उपग्रह विश्वविक्रमात 7 विद्यार्थ्यांचा सहभाग; मानवधन संस्थेचे विद्यार्थी
इंदिरानगर (जि. नाशिक) : तमिळनाडूतील श्रीहरीकोट्टा येथील पट्टीपुरम येथून १९ फेब्रुवारीला एक रॉकेट देशातील ५ हजार विद्यार्थ्यांनी बनवलेले १५० पिको उपग्रह घेऊन अवकाशात झेपावले अन् या विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली.
यातील एक उपग्रह बनवणाऱ्या नाशिकमधील मानवधन संस्थेच्या धनलक्ष्मी शाळेचे तीन, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियमच्या चार विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. यातील सर्वेश मगर हा विद्यार्थी प्रत्यक्ष लॉन्चिंगच्या वेळी तेथे उपस्थित होता. (Success Story 7 students participated in Pico satellite world record Students of Manav Dhan Sanstha nashik news)

उपग्रह लॉन्चिंगसाठी प्रत्यक्ष उपस्थित असलेला सर्वेश मगर.
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या स्टुडंट सॅटेलाईट लॉन्च व्हेहिकल २०२३ मिशनची आणि त्यातील सहभागी विद्यार्थ्यांची गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
पुणे येथील एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित कार्यशाळेत मानवधन संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह स्कूलचे आठवीतील विद्यार्थी योहन ठाकूर, मनीष पाटील, भाग्येश घेवरे, प्रेम देवरे, धनलक्ष्मीच्या कार्तिक चोथवे (८ वी), सर्वेश मगर, गौरव मगर (९वी) या विद्यार्थ्यांनी हा उपग्रह तयार केला होता.
विद्यार्थी संशोधनासाठी प्रेरित
उपग्रह लॉन्चिंगच्या वेळी पोंडेचरीच्या राज्यपाल डॉ. तामिलीसाई सुंदरराजन, स्पेस झोन इंडियाचे शास्त्रज्ञ आनंद मेघलिंगम, मार्टिन ग्रुपचे मार्टिन जोसेफ, फाउंडेशनचे शेख सलीम, मिलिंद चौधरी, राज्य समन्वयक मनीषा चौधरी आदींसह इस्रो आणि ‘डीआरडीओ’चे ठराविक शास्त्रज्ञ उपस्थित होते.
सहावी ते बारावीच्या देशभरातील या ५ हजार विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील संशोधनासाठी प्रेरित करणे, त्याचे पर्यवेक्षण करणे व १५० पिको उपग्रह तयार करण्यासाठी त्यांचे ज्ञान वापरणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट होते.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे, मुख्याध्यापिका वैशाली पवार, उपमुख्याध्यापिका पुनम पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षिका मोसिना शेख, वर्गशिक्षिका अपर्णा सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
स्पेस झोन इंडिया तर्फे होणार सन्मान
विद्यार्थ्यांच्या सहभागातून झालेल्या या विश्वविक्रमी उपक्रमासाठी या सर्व विद्यार्थ्यांना गीनिज बुक, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसतर्फे या विक्रमासाठीचे प्रमाणपत्र देण्यात येणार असून फाउंडेशन आणि ‘स्पेस झोन इंडिया’तर्फे देखील त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.