
Success Story: इंग्लडमध्ये आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत पंकज भुजबळांच्या दोन्ही मुलींना सुवर्ण पदक!
मुंबई, नाशिक : इंग्लंड येथील केंट शहरात झालेल्या इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप २०२३’ या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या दोन्ही मुली कु.देविशा व कु. तनिष्का पंकज भुजबळ यांनी सुवर्ण कामगिरी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.
भारतासाठी गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (Success Story Both daughters of Pankaj Bhujbal gold medals in international archery competition in England nashik news)
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
कु.देविशा व कु. तनिष्का या दोघीही भुजबळ नॉलेज सिटी एमईटी मुंबई या विद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. इंग्लडच्या मेडवे पार्क स्पोर्ट्स सेंटर, गिलिंगहॅम, केंट येथे १३ ते १८ फेब्रुवारी मध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ३८ देशातील ५६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत भारताचे १२ स्पर्धक विविध वयोगटात आणि वेगवेगळ्या धनुष्य प्रकारात सहभागी झाले होते. या स्पर्धेत देविशा पंकज भुजबळ हिने १९ वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात सुवर्णपदक आणि तनिष्का पंकज भुजबळ हिने १७ वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात १ सुवर्णपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्जवल केले आहे.भारतीय संघ हा फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या बॅनरखाली खेळला होता.
या स्पर्धेचे उदघाटन मिडवे केंट च्या महापौर सौ. जेन अल्डोस आणि श्री टॉनी अल्डोस तसेच आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष मार्टिन कोइनी, उपाध्यक्ष स्टिफन केंड्रीक, उपाध्यक्ष मेरियेट फ्रायर, सचिव लेन एलिंगवर्थ आणि इंग्लंड फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष डेव मुरे यांच्या हस्ते पार पडले.