Success Story : इन्शीच्या गिरीशची आकाश भरारी!; आदिवासी कुटुंबातील युवक बनला पायलट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

girish mahale

Success Story : इन्शीच्या गिरीशची आकाश भरारी!; आदिवासी कुटुंबातील युवक बनला पायलट

कळवण (जि. नाशिक) : तालुक्यातील इन्शी येथील आदिवासी कुटुंबातील गिरीश महाले याने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर पायलट होत नवे आकाश गाठले आहे. नाशिक येथे वास्तव्य करणाऱ्या तसेच, सहकार खात्यात लेखापरीक्षक पदावर काम करणारे मुरलीधर दोधा महाले यांचा गिरीश हा मुलगा आहे. (Success Story inshi Girish youth from tribal family become pilot nashik news)

गिरीशने नाशिकमधील महाविद्यालयामधून बारावी विज्ञान केल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व इतर शाखेच्या पुढील शिक्षणाकरीता न जाता कमर्शियल पायलट होण्याचे ठरवले. मुळात गिरीश अत्यंत हुशार असल्यामुळे नवा मार्ग स्वीकारून पायलट होण्याचे निश्‍चित केले.

शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रखर बुद्धिमत्ता आणि सर्वांच्या प्रोत्साहनातून देशात एकमेव असलेल्या शासकीय इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अॅकॅडमी, रायबरेली (उत्तर प्रदेश) या संस्थेत परीक्षा व मुलाखतीत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून त्याने प्रवेश मिळवला. विमान उड्डाणाचे प्रशिक्षण उत्तम पार पाडले.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

प्रथम श्रेणीचे गुण संपादित करून शिक्षण पूर्ण केले. गिरीशची त्याच्या तुकडीमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पायलट म्हणून प्रथम क्रमांकाने निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल मुंबई टाटा मेमोरियल ट्रस्टने पंचतारांकित हॉटेलमध्ये सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. हा सन्मान आदिवासी कोकणा समाजाच्या मुलाला पहिल्यांदा प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर गिरीशची इंडिगो एअर लाइन्समध्ये निवड झाली.

इंडिगोच्या वतीने गिरीशने विमान उड्डाणाचे विशेष प्रशिक्षण सिंगापूर येथे पूर्ण केले. गिरीशच्या या निवडीचे कळवण आणि नाशिकमधील सर्वच आदिवासी बचाव अभियान, मित्र परिवार, नातेवाईक व हितचिंतकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. गुरूवारी दळवट येथे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

"सध्याच्या काळात तरुणांना करिअरसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. पारंपरिक करिअरमागे धावण्यापेक्षा वेगळ्या पर्यायांचा शोध घेतल्यास नक्कीच चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता जिद्दीने प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते."

- गिरीश महाले, पायलट