
Success Story : फोटोग्राफी करत करत झाला चित्रपट निर्माता; वणीतील तरुणाची गगनभरारी!
वणी (नाशिक) : चित्रपट सृष्टीचे मृगजळ प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. या संगणकीय युगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चित्रपट निर्मिती होते त्याला फार मोठ्या धनदांडग्यांच्या मदतीची गरज असते.
मात्र आर्थिक परिस्थिती नसतांना ग्रामीण भागातील साधनसंपत्ती आणि स्वतःचे कौशल्य वापरून वणीतील फोटग्राफीचा व्यवसाय करणाऱ्या सुनिल गांगुर्डे या होतकरु तरुणाने 'मन जडलं' या नावाच्या चित्रपटाची निर्मिती करुन इच्छाशक्तीच्या बळावर आपण कोणतेही ध्येय साध्य करु शकतो हे सिद्ध केले आहे. (Success Story of photographer turned filmmaker sunil gangurde of Vani nashik news)
वणी ग्रामपंचायतीचे निवृत्त कर्मचारी असलेले नंदलाल गांगुर्डे यांचे चिरंजीव व फोटोग्राफीचा व्यवसाय करणाऱ्या सुनिल गांगुर्डे या तरुणाने चित्रपटाची आवडीतून मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवण्याचा धाडसी निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला.
आर्थिक परिस्थिती नसतांनाही चित्रपट सृष्टीतील सखोल बारकावे याबाबत अज्ञात असताना देखील जिद्द, मेहनत, आत्मविश्वासाच्या जोरावर चित्रपट निर्मितीचे ध्येय व निश्चय उराशी बाळगुन आर्थिक समस्या व अनेक अडचणींवर मात करुन मन जडलं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
विशेष म्हणजे सुनिल गांगुर्डे यांनीच लेखक, दिग्दर्शक व निर्माता अशी तिहेरी कामगीरी केली असून चित्रपटात स्थानिक व ग्रामिण भागातील नवोदीत कलाकारांना चित्रपटात अभिनयाची संधी दिली आहे. वणी येथील श्री खंडेराव महाराज मंदीर पटांगणात सोमवारी, ता. १३ रोजी ७ वाजता "मन जडलं" सिनेमाचे गाणे व पोस्टर प्रदर्शीत हजारो वणीकराच्या साक्षीने करण्यात आले.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
कार्यक्रमाच्या प्रारंभी आयोजकांच्यावतीने कार्यक्रमास उपस्थित असलेले सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड, महेंद्र बोरा, महेंद्र पारख, रविभाऊ सोनवणे, मुन्नाभाई मनियार, भरत कड, सुनिल बर्डे, राहुल गांगुर्डे, लजगन वाघ, विजय बर्डे, भगवान गायकवाड, नितीन गांगुर्डे, अशोक निकम आदींसह चित्रपटास मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चित्रपटाचा कलाकारांची प्रेक्षकांमधून स्टेजवर आगमन होवून परीचय करुन देत, चित्रपट शुटींग दरम्यानचे अनूभव कथन केले. यानंतर कलाकार व मान्यवरांच्या हस्ते गाणे व पोस्टर यावेळी प्रदर्शित केले. मार्च महिन्यात मन जडल हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
"लहानपणापासून चित्रपट तयार करण्याचे स्वप्न होते, तसेच लेखन व फोटोग्राफीची आवडीतून चित्रपट तयार करण्याचे ठरविले. आर्थिक बाजु कुमकुवत व त्यात कोविडचे ओढावलेले संकट यातून नातेवाईक, मित्र, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मात करुन चित्रपट पुर्णत्वास आणला आहे. चित्रपट मायबाप प्रेक्षकांचा पसंतीस नक्कीच उतरेल अशी मनापासून खात्री आहे."
- सुनिल गांगुर्डे - मन जडलंचे, लेखक, दिग्दर्शक व निर्माता