esakal | धक्कादायक! चांदवडला रेमडेसिव्हिर ऐवजी भुलेच्या इंजेक्शनची विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

Suspect arrested for selling fake injections instead of remedivir at Chandwad

धक्कादायक! चांदवडला रेमडेसिव्हिर ऐवजी भुलेच्या इंजेक्शनची विक्री

sakal_logo
By
हर्षल गांगुर्डे

गणूर (जि. नाशिक) : चांदवड शहरात रेमडेसिव्हिर (remedesivir) म्हणून दुसराच द्रव पदार्थ बाटल्यामध्ये भरून अज्ञात व्यक्ती विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना (Siv Sena) शहराध्यक्ष संदीप उगले व सहकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करून बनावट रेमडेसिव्हिर विकणाऱ्या तरुणास चांदवड पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी चांदवड पोलिसांत उगले यांच्या तक्रारिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Suspect arrested for selling fake injections instead of remedivir at Chandwad)

कोरोना काळात फायदेशीर ठरणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा तुटवडा राज्यभर जाणवत आहे. वितरण व्यवस्थेचे सर्व नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असताना देखील कुठून तरी रेमडेसिव्हीर मिळेल अन आपल्या रुग्णाचा जीव वाचेल या आशेतून नातेवाईक अधिक किंमत देऊन धावपळ करताना दिसतात. यातून रेमडेसिव्हीरचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार फोफावला असून हतबल नागरिक फसवणुकीला बळी पडत आहेत.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

रेमडेसिव्हीरची गरज असलेल्या अशाच रुग्णांच्या नातेवाइकांना हेरून त्यांना अधिक किंमत मोजाल तर रेमडेसिव्हीर मिळवून देतो असं सांगणारा तरुण चांदवड उपजिल्हा रुग्णालय आवारात गुरुवारी (ता.६) फिरत असल्याचं समजताच. चांदवड शिवसेना शहराध्यक्ष संदीप उगले व सहकाऱ्यांनी रेमडेसिव्हीरचे गिऱ्हाईक बनून रेमडेसिव्हीरच्या नावाखाली दुसरचं द्रव्य विकणाऱ्या तरुणाला रंगेहाथ पकडले. किरण सुभाष साळवे (वय ३३; राहणार मनमाड ता. नांदगाव) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून याच्यासह रोहित घरटे (राहणार कल्याण) यांच्याविरूद्ध संदीप उगले यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक समीर बारावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सणस तपास करीत आहेत.

हेही वाचा: नाशिकमध्ये ‘टॉसिलिझुब’ इंजेक्शनचा काळा बाजार! फार्मसीचे 2 विद्यार्थी ताब्यात

यांची समयसुचकता…

रेमडेसिव्हीर म्हणून दुसरंच द्रव्य विकणाऱ्या तरुणाची माहिती मिळताच शिवसेना शहराध्यक्ष संदीप उगले यांच्यासह ब्ल्यू पंथर्स संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग भडांगे, दीपक शिरसाठ, धीरज संकलेचा आदींनी सापळा रचून संशयित तरुणास पोलिसांच्या ताब्यात दिले.

बनावट रेमडेसिव्हीर प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयिताने दिलेल्या माहितीच्या आधारावर मनमाड येथील तरुणासह कल्याण येथील संशयित साथीदार रोहित घरटे याच्यावर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिशय गंभीर असलेल्या या प्रकरणात गरजू रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचे पाळ-मूळ शोधून ती उदध्वस्त केली जाईल. अशा कुठल्याही गैरप्रकाराची माहिती मिळताच चांदवड पोलिसांशी संपर्क करा, गोपनीयता जपली जाईल.

- समीर बारावरकर, पोलिस निरीक्षक चांदवड

त्या बाटलीत द्रव्य रुग्णास दिले असते तर….

दरम्यान त्या बाटलीत कुठलं द्रव्य आहे याबाबतची पडताळणी केली असता भूल देण्यासाठी देण्यात येणार लिग्नोकेन नावाचं इंजेक्शन असल्याचं डॉ. रमाकांत सोनवणे यांनी तपासणी केल्यानंतर उघड झाले. हे इंजेक्शन घाई-गडबडीत रुग्णास दिले गेले असते तर त्याचे काय परिणाम होतील, याबाबत भूलतज्ज्ञ डॉ. शशिकांत देवढे यांनी सांगितले, की ‘हे इंजेक्शन भुलेसाठी वापरतात, पण रक्तवाहिन्या मधून देता येत नाही तर जागेवर बधिरपणा आणण्यासाठी वापर होतो. चुकून जरी हे रक्तवाहिनीतून शरीरात गेले तर मेंदू आणि हृदयावर याचे दुष्परिणाम जाणवतात. रुग्णाला झटके येतात व हृदयक्रियाबंद पडून मृत्यू देखील होऊ शकतो.’ अशी माहिती त्यांनी दिली.

Suspect arrested for selling fake injections instead of remedivir at Chandwad

हेही वाचा: गारपीटीने सर्वकाही होत्याचे नव्हते! अनेक गावे 4 दिवसांपासून अंधारात

loading image
go to top