esakal | गारपीटीने सर्वकाही होत्याचे नव्हते! अनेक गावे 4 दिवसांपासून अंधारात
sakal

बोलून बातमी शोधा

गारपीटीने सर्वकाही होत्याचे नव्हते! अनेक गावे 4 दिवसांपासून अंधारात

गारपीटीने सर्वकाही होत्याचे नव्हते! अनेक गावे 4 दिवसांपासून अंधारात

sakal_logo
By
विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्याच्या पूर्व भागाला मागील सलग चार दिवस वीज, गारपीट, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खेड, पिंपळगाव मोर, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, धामणगाव, टाकेद, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव, कांचनगाव आदी भागात भाजीपाला पिकांसह अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने अद्यापपर्यंत पाहणी केली नसून, पंचनामेही केले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

चार दिवसांपासून सुरू झालेल्या वीज, वारा गारपीटीसह आलेल्या पावसामुळे टोमॅटो, कांदे, काकडी, कारले, भोपळे, दोडके आदी भाजीपाला पिकांसह शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. वर्षापासून पोटच्या मुलासारखं पिकांना जपत असलेला शेतकरी या चार दिवसांत पूर्णपणे ढासळला आहे. या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला. विजेचा कडकडाट, गारपीट, तसेच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजखांब, वीजवाहिन्या कोलमडून पडल्या. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. नुकसानीचे शासनाकडून पंचनामे होणार का, नुकसानीची भरपाई देणार का, असा सवाल शेतकरी करीत आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा; केंद्रांवर गर्दी

हातात आलेले पीक हिरावून घेतले आहे. दोन लाख रूपये खर्च वाया गेला असून, शासनाच्या तुटपुंज्या मदतीने काही फायदा होत नाही. तरीही शासनाने दखल घेऊन काहीतरी मदत दिल्यास दिलासा मिळेल.

- लहाणू गव्हाणे, शेतकरी, कांचनगाव

कर्ज काढून आणलेल्या दोन म्हशी वीज पडून मरण पावल्यामुळे परिवारावर संकट कोसळले आहे. शासनाकडून सदर नुकसानीची भरपाई मिळावी.

- उत्तम यंदे, नुकसानग्रस्त शेतकरी.

हातातोंडाशी आलेली पिकांचे नुकसान झाल्यामुळे पुर्णत: हतबल झालो आहे. अद्याप शासनाच्यावतीने कुठल्याही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने पाहणी केलेली नाही. पंचनामेदेखील केले नसल्याने नुकसान भरपाई मिळेल का, की प्रतिक्षाच करावी लागेल?

- पूंजाराम गाढवे, धामणगाव.

हेही वाचा: पिंपळगाव बाजार समितीत 45 हजार क्विंटल कांद्याची आवक; 4 कोटींची उलाढाल