ZP CEO Action : ममदापूर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन; आशिमा मित्तल यांचा दणका | Suspension of Mamdapur Community Health Officer ZP CEO Ashima Mittal Action nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP CEO Ashima Mittal, Nashik News

ZP CEO Action : ममदापूर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन; आशिमा मित्तल यांचा दणका

ZP CEO Action : येवला तालुक्यातील राजापूर अंतर्गत येणाऱ्या ममदापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट दिली असता येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. योगिता गायकवाड यांचे कामकाजात त्रुटी दिसून आल्या.

त्यामुळे श्रीमती मित्तल यांनी डॉ. गायकवाड यांचे तत्काळ निलंबित केले आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून आदेश देखील काढण्यात आले. या कारवाईमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Suspension of Mamdapur Community Health Officer ZP CEO Ashima Mittal Action nashik News)

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतील कामकाजाबाबत अनेकदा तक्रारी झाल्या. दोन महिन्यात काही आरोग्य केंद्रातील कारभार देखील चव्हाट्यावर आला होता. त्यावेळी श्रीमती मित्तल यांनी आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देण्याचे फर्मान आरोग्य विभागास काढले होते.

प्रत्यक्षात, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडून या भेटी झाल्या नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवारी (ता.७) येवला दौऱ्यावर असताना राजापूर अंतर्गत येणाऱ्या ममदापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देण्याचे सांगितले.

त्यावर आरोग्य विभागाची तारांबळ उडाली होती. अशातच श्रीमती मित्तल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता ममदापूर उपकेंद्रात थेट पोचल्या. अचानक आलेल्या सीईओंना बघून तेथील कर्मचाऱ्यांची सुरूवातीस चांगलीच धावपळ उडाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्रीमती मित्तल यांनी उपकेंद्रातील नोंदवही तपासली. यात सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत १० रुग्णांची तपासणी झाल्याची नोंद केलेली होती. सदर नोंदीत घोळ दिसून आला असता श्रीमती मित्तल यांनी कागदपत्रे तपासली.

तसेच येथील ग्रामस्थांकडेही विचारणा देखील केली. त्यात ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर, श्रीमती मित्तल यांनी तत्काळ उपस्थितीत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांचे निलंबन करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनास दिले.

मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या अचानक भेटी पुन्हा सुरू झाल्याने आरोग्य यंत्रणेमध्ये चुकीचे कामे करणाऱ्यांना घाम फुटला आहे.

टॅग्स :NashikZP