
Positive News : आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या वैभवच्या आयुष्याला मिळाली रूपालीताईंची छाया!
नाशिक : खेळण्या-बागडण्याच्या वयातच जगाशी काहीही संपर्क नसलेल्या पठाडे कुटुंबातील वैभवच्या आई-वडिलांचं छत्रच नियतीनं हिरावून नेलं. जवळचं आधार देणारं कोणीही नसताना तनिष्का व्यासपीठाच्या भगिनीनं दिलेला आधार नक्कीच माणुसकीचं दर्शन देवून गेलाय. (Rupali shejwal adopted Vaibhav who lost his parents nashik Positive impact News)
चांदवड तालुक्यातील पठाडे कुटुंबाचा आधार असलेले वैभवच्या वडिलांचे कुटुंब मजुरी करणारं... सकाळी कमवून आणल्यानंतरच सायंकाळी चूल पेटते. कोवळ्या वैभवच्या वाट्याला आलेलं आयुष्य म्हणजे नियतीनं दिलेलं मोठं दुःखच... काही वर्षांपूर्वी वैभवच्या वडिलांचे अल्प आजारानं निधन झाल्यानं कुटुंबाच्या दुःखात भर पडली. त्यामुळे आईच वैभव आणि त्याच्या सावत्र भावाची काळजी घेत त्यांच्यासाठी आधार बनल्या.
मात्र मजुरी करताना मिळणारे कामही रोजचे नव्हते. बेभरवशाच्या तुटपुंज्या मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मात्र वैभवची आईही अंथरुणाला खिळली. अभ्यासात हुशार असलेल्या वैभवला आईसाठी कोवळ्या वयातच बालमजूर म्हणून शेतात कामाला जावे लागले. नियतीसमोर पठाडे कुटुंब हतबल झाले. मात्र अंथरुणावर खिळलेली आई कधीही आजारातून सावरूच शकली नाही. वैभवच्या आईचेही नुकतेच चार महिन्यांपूर्वी निधन झाल्याने त्याच्यासमोर डोंगराएवढं दुःख आलं.
दुगावकरांनी घडवलं माणुसकीचं दर्शन
वैभवसमोर उभ्या राहिलेल्या दुःखानं गावातील माणुसकी गहिवरली. गावाने वैभवसाठी आधार होण्याचं ठरवत असतानाच चांदवड येथील तनिष्का व्यासपीठाच्या गटप्रमुख रूपाली शेजवळ यांच्यापर्यंत ही वार्ता पोचली. रूपालीताई चांदवड तालुक्यातील अनेक निराधार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतानाच त्यांच्यासाठी त्या आधार बनल्या आहेत.
वैभवलाही चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथील आश्रमशाळेत प्रवेश देतानाच त्याची आयुष्यभराची जबाबदारी रूपालीताईंनी घेतली आहे. वैभवच्या आयुष्यात नियतीनं दिलेल्या दुःखात रूपालीताईंनी दिलेला आधार नक्कीच मोलाचा ठरला आहे. वैभवला सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी आश्रमशाळेमार्फत घेतली जाईल, असे शाळेचे अध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी सांगितले.
हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥
पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणतेना कोणते कार्य करण्यासाठी बांधिल आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य, वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात. पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो. श्रीमद् भगवत गीतेतील कर्मफल सिद्धांत दिलेली शिकवण आपल्या कार्यात आणत रूपालीताई सुख व आनंदाची अनुभूती घेत आपल्या कृतीतून गुरू बांधव व भगिनींपुढे आदर्श ठेवत आहेत.
"अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मी इथंपर्यंत पोचली आहे. माझ्या वाट्याला आलेलं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी माझे नेहमीच प्रयत्न असतात. राज्याचे मुख्य अतिरिक्त सचिव नंदकुमार यांनी दिलेल्या निपुण भारतच्या प्रशिक्षण कार्यशाळेतून मुलांसाठी कामाची प्रेरणा मिळाली. तसेच ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाने दिलेल्या पाठबळामुळेच हे शक्य झाले आहे." - रूपालीताई शेजवळ, तनिष्का गटप्रमुख व शिक्षिका