तपोवन वृक्षतोडप्रकरणी
२५ जानेवारीस सुनावणी
जिल्ह्यातील वृक्षतोडीवर २५ ला सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.४ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीसह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील वृक्षतोडीचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादात अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या दोन्ही प्रकरणांचा निकाल अद्याप लागलेला नसून तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जानेवारी २०२७ ला तर जिल्ह्यातील वृक्षतोडीसंदर्भातील दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे. अनेक सुनावण्या, अंतरिम आदेश आणि प्रतिवाद्यांचे म्हणणे यानंतरही अंतिम निर्णयाची प्रतीक्षा कायम असल्याने नाशिकच्या पर्यावरणाच्या दृष्टीने या सुनावण्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सिंहस्थासाठी तपोवनात साधुग्राम आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड प्रस्तावित करण्यात आली होती. त्याला पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र विरोध केला. या प्रकरणात ॲड. श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादात याचिका दाखल केली. वृक्षतोडीपूर्वी कायदेशीर प्रक्रिया, वृक्षगणना, सार्वजनिक सूचना आणि हरकतींचा विचार झालेला नाही, असे आक्षेप याचिकेत घेण्यात आले. डिसेंबर २०२५ मध्ये लवादाने वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला होता. त्यानंतर तपोवनासह इतर ठिकाणांची पाहणी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीही नियुक्त करण्यात आली.
पर्यावरणप्रेमी मनीष बाविस्कर यांनीही नाशिक महापालिकेच्या वृक्षतोडीच्या नोटिसांना आव्हान देणारी स्वतंत्र याचिका दाखल केली. ७ एप्रिल २०२६ ला हरित लवादाने अनेक नोटिसांमध्ये वृक्षांची संख्या, प्रजाती आणि तोडीची कारणे स्पष्ट नसल्याचे निरीक्षण नोंदवत शहरातील वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली. महापालिकेने स्थगिती उठविण्याची मागणी केली; मात्र लवादाने ती तातडीने मान्य केली नाही. अत्यावश्यक परिस्थितीत वृक्षतोडीसाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची तरतूद केली. सर्वोच्च न्यायालयात ॲड. श्रीराम पिंगळे यांच्यामार्फत याचिकाकर्त्यांची बाजू मांडली जात असून नाशिक महापालिकेला या प्रकरणांत आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.