esakal | म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स : छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स : छगन भुजबळ

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस (mucormycosis) आजार प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यासाठी जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी (treatment task force) टास्क फोर्स उभारून मॉडेल ऑपरेशन थिएटरची तातडीने निर्मिती करण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १३) पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

कोरोना उपचारानंतरच्या अनेक व्याधींचाही सामना

भुजबळ म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, काही रुग्णांना कोरोना उपचारानंतरच्या अनेक व्याधींचाही सामना करावा लागतोय. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने अनेक रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. त्यासाठी पोस्ट कोविड सेंटरवर कान-नाक-घसातज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी. कोविड झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी. या आजाराचे गंभीर स्वरूप विचारात घेता याकरिता योग्य ती पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने तसेच टास्क फोर्स गठित करून यामध्ये जिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय आणि खासगी डॉक्टरांचाही समावेश करण्यात यावा, असे बैठकीत ठरले.

हेही वाचा: मालेगावात रमजान ईदनिमित्त घरीच नमाजपठण; शुक्रवार-जुम्मा व ईद समीकरणाने आनंद!

टास्क फोर्सने सूचना कराव्यात

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश करण्यात आला असून, जिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय आणि खासगी डॉक्टरांच्या एकत्रित मदतीने कामकाज करण्यात यावे. जनआरोग्य योजनेत कान, नाक व घसा यावर उपचार करणाऱ्या ज्या रुग्णालयांचा समावेश नाही, त्यांचा तातडीने समावेश करण्यात यावा. तसेच खासगी डॉक्टरांनी यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहनही या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पालकमंत्री भुजबळ यांनी केले आहे. कोरोनामुक्त रुग्णांना उपचारांमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत, जिल्ह्यातील आजची वैद्यकीय व्यवस्था विचारात घेता त्यामध्ये अधिक काय सुधारणा करणे आवश्यक आहे, याबाबत टास्क फोर्सने सूचना कराव्यात, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिकमधील ‘त्या’ भुयारी मार्गाचे गूढ कायम; पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची गरज

अशी असेल समिती

म्युकरमायकोसिस टास्क टास्क फोर्स समितीमध्ये तज्ज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. पुष्कर लेले, डॉ. प्रदीप गोंधळे, डॉ. शीतल गुप्ता, डॉ. भरत त्रिवेदी, डॉ. संजय बापये, महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महापालिकेचे नोडल ऑफिसर कोरोना व्यवस्थापन डॉ. आवेश पलोड आदी सदस्य असून, या समितीचे समन्वय म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात काम पाहतील.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. पुष्कर लेले, डॉ. प्रदीप गोंधळे आदी उपस्थित होते.