खासगी ‘टीबी’ इनडोअर उपचार केंद्रांना टाळे
गंभीर रुग्ण आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात; मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : क्षयरोगाच्या लढाईत काही वर्षांपासून खासगी भागीदारीतून चालवला जाणारा महत्त्वाचा उपक्रम आता बंद होणार आहे. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत औषधांना दाद न देणाऱ्या म्हणजेच औषधप्रतिरोधक टीबीच्या रुग्णांसाठी सुरू असलेली इनडोअर उपचार केंद्रं नाशिकसह संपूर्ण राज्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या मंजूर आराखड्यातूनच या उपक्रमांना वगळण्यात आल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी याबाबतचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत. त्यामुळे यापुढे गंभीर रुग्णांची जबाबदारी थेट शासकीय यंत्रणेवर येणार आहे. नव्या आदेशानुसार, औषधप्रतिरोधक क्षयरोगाच्या गंभीर रुग्णांना आता जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील क्षयरोग उपचार वॉर्डमध्ये दाखल केलं जाणार आहे. तिथे आंतररुग्ण विभागात दाखल करून मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार दिले जातील.
बहुऔषधप्रतिरोधक आणि अतिऔषधप्रतिरोधक टीबीवरील उपचारांसह औषध संवेदनशीलता तपासणीची सुविधा देखील याच वॉर्डमध्ये उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. म्हणजेच रुग्णाला बाहेर भटकावं लागणार नाही, सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतील असा प्रशासनाचा दावा आहे.
-----------
अवलंबित्व कमी होणार
टीबी संशयितांच्या तपासणीसाठी आतापर्यंत खाजगी एक्स-रे केंद्रांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागत होते. आता ही पद्धत बदलण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयांमधील उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात सध्या ५६७ डिजिटल एक्स-रे यंत्रे आणि १४६ हँडहेल्ड एक्स-रे युनिट्स कार्यरत आहेत. याच यंत्रणेच्या माध्यमातून संशयित रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे तपासणीचा वेग वाढेल आणि खर्चही कमी होईल, असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे.
-------------चौकट
सर्व रुग्णांची यादी करून वर्गीकरणाचे आदेश
खासगी संस्था किंवा डॉक्टरांकडे तपासणी आणि उपचारांसाठी पाठवलेल्या सर्व रुग्णांची तातडीने यादी तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हे रुग्ण आता शासकीय आरोग्य यंत्रणेकडे वर्ग केले जाणार आहेत. त्याचबरोबर संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील क्षयरोग वॉर्डची स्थिती, आवश्यक चाचण्या, डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग, यंत्रसामग्री आणि औषधांचा साठा याचा सविस्तर आढावा घेण्यास सांगण्यात आलं आहे. यात कुठेही कमतरता आढळली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कळवावं, असे स्पष्ट निर्देश आहेत.
----------------चौकट
महापालिकेला स्वनिधीतून पर्याय खुला
नाशिक महापालिकेला स्थानिक गरज लक्षात घेऊन हा उपक्रम सुरूच ठेवायचा असेल तर त्यासाठी एक पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. महापालिका स्वतःच्या स्वनिधीतून हा उपक्रम चालवू शकते. मात्र, त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून कोणताही स्वतंत्र निधी मिळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे खाजगी सहभागातील उपक्रम बंद झाल्यानंतर रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, औषधांचा तुटवडा भासू नये आणि शासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज राहावी, याकडे प्रशासनाला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे.
---------------